नागपूर : एसटी बसचा संप सुरूच आहे. त्यामुळं एस महामंडळानं खासगी बस वाहक, चालकांना आमंत्रित केलंय. परंतु, बसची तोडफोड झाल्यास कोण जबाबदार यावरून एकमत होऊ शकलं नाही. याची जबाबदारी एसटी महामंडळानं घ्यावी, असं खासगी वाहनचालकांच म्हणण होतं. पण, ही जबाबदारी घेण्यास महामंडळ तयार नाही. त्यामुळं खासगी बस परतल्यानं प्रवाशांची अडचण होत आहे.
बरखास्त करा, सेवेतून मुक्त करा, काहीही कारवाई करा, पण आम्ही कामावर येणार नाही. संप सुरुच राहील, असा निर्धार एसटीच्या कर्मचाऱ्यांनी दिलाय. नागपुरातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. परिवहन मंत्र्यांच्या बरखास्तीच्या इशाऱ्यानंतरही नागपुरातील एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. कुठलीही कारवाई केली, तरीही आम्ही संप मागे घेणार नाही, असं कर्मचाऱ्यांच्या म्हणण आहे.
एसटी सुरु करण्यासाठी आज वर्कशॅापमधून नागपूर स्थानकावर चार चालक येणार आहेत, अशी माहिती नागपूर गणेशपेठ आगारातील एसटीचे आर. एम. गजानन नागुलवार यांनी दिली.
बसेस सुरु करण्यासाठी महामंडळाचे प्रयत्न सुरु आहेत. नागपूर गणेशपेठ आगारातील बस काढण्यासाठी आलेले दोन चालक काल परत केल्याचं ते म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडण्यासाठी भंडारा आगार यांनी कंबर कसली आहे. त्यांना सतत तोंडघशी पडावे लागत असल्याचं चित्र दिसत आहे. विदर्भात साकोली आगारातून दुसऱ्यांदा बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. संपकऱ्यांना न सांगता काल साकोली आगारातून एक बस सोडली. मात्र आज त्या गाडीचे चालक-वाहक संपात सहभागी झाले. त्यामुळं साकोली आगाराच्या स्वप्नावर विरजण पडले. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी शासनात विलिनीकरणाचा लढा अजून प्रखर झाला आहे. मागील २५ दिवसांपासून सुरू असलेल्या संपानंतर साकोली आगारातील एक बस साकोली से भंडारा मार्गावर 10 प्रवासी घेऊन रवाना झाली होती. मात्र आज तीही लालपरी संपात पुन्हा एकदा सहभागी झाली आहे.