नागपूर : अजनीतील एका सलूनमध्ये मसाज तरुणींकडून करून घेतले जात होते. त्यामुळं या सलूनच्या ग्राहकांमध्ये वाढ झाली. त्यानंतर तिथं देहव्यापारही सुरू झाला. ही माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. यात दोन तरुणींची सुटका करण्यात आली. आरोपी रवी चौधरी याला अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक कविता इसारकर यांना गुप्त माहिती मिळाली होती की, बजाजनगर पोलिस ठाणे हद्दीत सलूनच्या नावानं देहव्यापार सुरू आहे. रवी चौधरी हा अजनी चौकातील भवानी चेंम्बरमध्ये रेडीफाईन द प्रोफेशन फॅमिली सलून येथे आर्थिक फायद्याकरिता मुलींना पैशाचे आमिष दाखवितो. त्यांना देहव्यापारास प्रवृत्त करून सलूनमध्ये ग्राहकांना पुरवतो.
देहव्यापाराची शहानिशा करून सापळा रचण्यात आला. या ठिकाणी धाड टाकण्यात आली. येथून दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली. या ठिकाणावरून रवी चौधरी (रा. जुनी अजनी) याला पोलिसांनी अटक केली. तो पीडित मुलींना पैशाचे आमिष दाखवून ग्राहकांना बोलावून स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता देह व्यवसाय करण्यास भाग पाडत होता. आरोपीविरुद्ध कलम तीन, चार, पाच, सात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अन्वये बजाजनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई शहराचे पोलिस आयुक्त (गुन्हे) सुनील फुलारी यांच्या निर्देशान्वये पोलिस उपायुक्त (डिटेक्शन) चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविता इसारकर, मंगला हरडे, अनिल अंबाडे, रशिद शेख आदींनी केली.
रवीनं ग्राहकाशी संबंध ठेवणाऱ्या तरुणींची सलूनमध्ये कर्मचारी म्हणून भरती केली. तो मुलींकडून थेट देहव्यवसाय करून घेत होता. रवीच्या सलूनमध्ये सेक्स रॅकेट चालते, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांनी आपल्या पंटरला या सलूनमध्ये पाठविले. तेथे रवीशी सौदा झाल्यानंतर रवीने दोन मुलींना बाहेर बोलावले. त्यापैकी एका मुलीची निवड करून तिच्यासोबत खोलीत पाठविले. पंटरने इशारा करताच दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने या सलूनमध्ये धाड घातली. त्यावेळी पंटर आणि मुलगी एका खोलीत मिळून आले.