नागपूर : येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांनी सुरक्षेला भगदाड पाडले. सुरक्षा रक्षकांच्या दारू पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मनोरुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारकांच्या सुरक्षेची जबाबदारी सुरक्षारक्षकांकडं असते. ड्युटी करण्याच्या जागेवर दारू पार्टी करत असतानाचा हा व्हिडिओ असल्यानं इथली सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर आहे.
कामाच्या ठिकाणी दारू पार्टी करणाऱ्या सुरक्षारक्षकांना रुग्णालयाचे अधीक्षक यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. प्रादेशिक मनोरुग्णालय हे 42 एकरवर पसरलेले आहे. परंतु त्या तुलनेत सुरक्षेची जबाबदारी बारा सुरक्षा रक्षकांवर आहे. रुग्णालयातील वॉर्डाकडं जाणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारावर येथे कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांवर वॉर्डातील रुग्णांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. पण तेच नशेत असतील तर सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होतो.
राज्यात नागपूर, पुणे, ठाणे आणि रत्नागिरी येथे प्रादेशिक मनोरुग्णालये आहेत. नागपूरच्या मनोरुग्णालयाची क्षमता 940 आहे. 496 मनोरुग्ण इथं उपचार घेतात. परंतु, कर्मचाऱ्यांची कमतरता नेहमीच जाणवते. डॉक्टरांचीही रिक्त पदे आहेत. सुरक्षा रक्षकच दारूपार्टी आयोजित करत असल्यानं सुरक्षेची जबाबदारी कोणाची असा प्रश्न निर्माण होतो.
मनोरुग्णांच्या सामाजिक पुनर्वसनाकडं लक्ष दिलं जातंय. व्हायरल झालेला व्हीडीओ हा प्रवेशद्वाराजवळचा आहे. येथे दारू ढोकसणारे सुरक्षा रक्षक व कर्मचारी यांना प्रशासनाकडून नोटीस देण्यात आलेली आहे. शासनाच्या नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी दिली.
मनोरुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टर, परिचारिका आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी हे सुरक्षा रक्षक ठेवले जातात. सुरक्षा रक्षकांची संख्या निश्चितच कमी आहे. परंतु, एवढ्या कमी संख्येचा ताण त्यांच्यावर येत असेल, का, हा ताण कमी करण्यासाठी तर त्यांनी दारूचा सहारा घेतला नसेल, असा प्रश्न निर्माण होतो. दारू घेणारे मनोरुग्ण तर नव्हते ना असाही प्रश्न विचारला जात आहे. मनोरुग्णांच्या मानसिकतेवर याचा काय परिणाम होईल?