नागपूर : शहरातील वाठोडा परिसरात 84 एकर जागेत स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडिया (साई) प्रस्तावित आहे. काही जणांनी अतिक्रमण केल्यामुळं साईचे काम रखडले होते. अतिक्रमणधारकांचे सात एकर जागेमध्ये जवळच पुनर्वसन करण्यात येणार आहे. दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
महापालिकेने 140 एकर जागा साईला सुपूर्त केली. याला राज्य सरकारनेदेखील मंजुरी दिली आहे. परंतु, यापैकी 60 एकर जागेवर स्थानिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रिकाम्या असलेल्या वाठोडा आणि तरोडी येथील 87 एकर जागेवरच साई उभारण्यात येणार आहे. त्यापैकी फक्त सात एकर जागेवरील नागरिकांचे अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. त्यांना दुसरीकडे जवळच जागा देण्यात येणार आहे.
खेलो इंडियाचे केंद्र नागपुरात सुरू करावे, अशी मागणी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केंद्रीय क्रीडामंत्री ठाकूर यांना दिल्लीमध्ये केली. क्रीडामंत्री ठाकूर यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती महापौर तिवारी यांनी दिली. निवेदनाची प्रतिलीपी ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविली. नागपूरने देशाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले आहेत.
नागपुरात महापालिका दरवर्षी खेलो नागपूर खेलो, खासदार क्रीडा महोत्सव, आयोजित करते. यात शहरातील वेगवेगळ्या खेळातील खेळाडू भाग घेतात. शहरात कबड्डी, बास्केटबॉल, खो-खो, बॉक्सिंग, टेबल टेनिस, पॅरालिम्पिक, वेटलिफ्टिंग, स्विमिंग, अॅथलेटिक्स, व्हॉलिबॉल, सॉफ्टबॉल आदी क्रीडा प्रकारात प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यामुळे क्रीडांगणाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी केंद्रीय क्रीडामंत्री ठाकूर यांना महापौर तिवारी यांनी केली.
इतर बातम्या :