औरंगजेब हा राज्याचाच नाही तर देशाच्या राजकीय केंद्रस्थानी आला आहे. छावा चित्रपटानंतर औरंगजेबाची क्रूरता प्रकर्षाने समोर आली आहे. यापूर्वी इतिहासाच्या पुस्तकातून औरंगजेबाची क्रूरता मांडण्यात आली होती. त्यानंतर राज्यात औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी तीव्र झाली आहे. काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळली. त्यानंतर हिंसाचार उफाळला. याप्रकरणी व्हीएचपीने आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. तर त्याचवेळी एक मोठी मागणी केली आहे.
औरंगजेबाच्या कबरीऐवजी शौर्याचे स्मारक
नागपूरमधे अफवा पसरवून आणि हिंसे प्रकरणात जिहाद्यांविरोधात कडक कारवाई व्हावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. याविषयीचे प्रसिद्धी पत्रक व्हीएचपीने प्रसिद्ध केले आहे. तसेच औरंगजेबच्या कबरीच्या जागी छत्रपती राजाराम महाराज आणि पराक्रमी मराठा सरदार धनाजी जाधव, संताजी घोरपडे यांचे स्मारक उभारावे अशी मागणी केली आहे.
हिंदूच्या घरावर हल्ले
विहिपचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी काल झालेल्या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला आहे. नागपुरमध्ये काल रात्री मुस्लिम समाजातील एका गटाने जाळपोळ आणि हल्ल्यांच्या घटना घडवल्या, असा आरोप परांडे यांनी केला. या हिंसाचारात हिंदूच्या घरांना लक्ष करण्यात आले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या घरांवर जाणीवपूर्वक हल्ले करण्यात आले. घरांना आगी लावण्यात आल्या. महिलांवर, मुलांवर हल्ले केल्याचे सांगत या हल्ल्याचा तीव्र निषेध केला.
तो आरोप सपशेल खोटा
काल विहिपने दुपारी औरंगजेबाच्या कबरीचे प्रतिकात्मक दहन केले होते. या आंदोलनात जो कपडा वापरण्यात आला. त्यावर आयात होती असा आरोप करण्यात येत आहे. त्यावर आता विश्व हिंदू परिषदेने स्पष्टीकरण दिले आहे. हिंदू समाजाने आयत जाळल्या नाहीत. तसा मुद्दामहून खोटा प्रचार करण्यात आला. हिंसा भडकवण्याचाच हा कट होता, असा आरोप परांडे यांनी केला. या समाजकंटक, जिहादी प्रवृत्तींवर कठोर कारवाईची मागणी परांडे यांनी केली आहे.
औरंगजेबाच्या कबरीचा पुळका नको
विहिप महामंत्री परांडे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगजेबाच्या कबरीचा पुळका कशाला असा रोकडा सवाल त्यांनी केला. औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन त्वरीत थांबवण्याचे आवाहन त्यांनी केले. औरंगेजबाची कबर हटवून त्याठिकाणी औरंगजेबाची झोप उडवणारे मराठा पराक्रमी सरदार धनाजी जाधव, संताजी घोरपडे यांच्यासह छत्रपती राजाराम महाराजांचे विजयी स्मारक उभारण्याची मागणी केली. मराठा पातशाहीत औरंगजेबाच्या पराभवाचे प्रतिक असलेला विजयस्तंभ उभारण्यात यावा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.