नागपूर | 17 ऑक्टोबर 2023 : नागपुरात पोलीस उपायुक्तांना भाजपच्या युवा शहर प्रमुखाकडून धक्काबुक्की करण्यात आलीय. धक्काबुक्कीचा व्हिडीओ खासदार संजय राऊत यांच्याकडून ट्विट करण्यात आलाय. हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारं आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. नागपूरचे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांना भाजपचे युवा शहराध्यक्ष पुष्कर पोशेट्टीव यांनी धक्काबुक्की केलीय. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. उपायुक्त पदाच्या पोलीस अधिकाऱ्याला अशाप्रकारे धक्काबुक्की कशी केली जाऊ शकते? अशी चर्चा सुरु आहे. या घटनेवरुन संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.
“हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारे आहे. मुक्काम पोस्ट : नागपूर, उपमुखयमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देवगिरी निवासस्थान. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांना भाजप युवा शहर प्रमूख पुष्कर पोशेट्टीव याने उघड धक्का बुक्की केली. खाकी वर्दीच्या कॉलरला हात घातला. स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्र इतका हतबल आणि लाचार कधीच झाला नव्हता”, असं म्हणत संजय राऊत यांनी व्हिडीओ ट्विट केलाय.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. “गृह खात्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून त्यांच्यात खात्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना अशाप्रकारे धक्काबुक्की केली जाते, मग भाजपकडून सर्वसामान्य नागरिकांवर काय अत्याचार होत असेल याचा हा पुरावा आहे. आज सकाळपासून ही बातमी दाबण्याचा प्रयत्न केला गेलाय”, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारे आहे:
मुक्काम पोस्ट:नागपूर
उपमुखयमंत्री व गृहमंत्री यांचे देवगिरी निवासस्थान.
पोलिस उपायुक्त राहुल मदने यांना भाजप युवा शहर प्रमूख पुष्कर पोशेट्टीव याने उघड धक्का बुक्की केली.खाकी वर्दी चया कॉलरला हात घातला..
स्पष्ट दिसत आहे.
महाराष्ट्र इतका… pic.twitter.com/a2dbAgWAAT— Sanjay Raut (@rautsanjay61) October 17, 2023
“अधिकाऱ्यांवर काय पद्धतीने अशी अरेरावी केली जाते, मागे शिंदे गटाच्या एका लोकप्रतिनिधीने डॉक्टरांना चक्क शौचालय साफ करायला लावलं, तर आता भाजपच्या एक पदाधिकारी उपायुक्त पदाच्या अधिकाऱ्यासोबत अशी गुंडागिरी केली जात असेल तर सर्वसामान्यांवरील दादागिरी काय असेल? देवेंद्र फडणवीस वारंवार तोंडघशी पडत आहेत. ते वारंवार गृहमंत्री म्हणून कमी पडताना दिसत आहेत. याचे हे पुरावे आहेत”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.