नागपूर : साराभाई टीचर्स सायंटिस्ट अवॉर्ड 2021 (Sarabhai Teachers Scientist Award 2021)साठी एक स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा केंद्र सरकारच्या सायंस अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट, रमण सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाउंडेशन, नॅशनल काउंसिल ऑफ टीचर्स सायंटिस्ट, एपीजे अब्दुल कलाम नॅशनल काउंसिल ऑफ यंग सायंटिस्ट या संस्थांद्वारे घेण्यात आली. बावीस राज्यांतून हजारो शिक्षकांनी भाग घेतला. सुरुवातीला शंभर गुणांचा ऑनलाईन पेपर घेण्यात आला. त्यातून पहिल्या पंचवीस जणांची मेरीट यादी काढण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात प्रोफाईल अपलोड करायची होती. त्याची स्क्रुटीनी झाल्यानंतर पहिल्या दहा जणांची यादी तयार करण्यात आली.
तिसऱ्या टप्प्यात प्रोफाईल प्रेझेंटेशन आणि ज्युरीसमोर प्रश्नोत्तरे झाली. त्याचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यामध्ये नागपूर महापालिकेतील शिक्षिका दीप्ती बिस्ट यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दीप्ती या सुरेंद्रगड हिंदी हायस्कूलमध्ये विज्ञान शिक्षिका आहेत. 2021 चा साराभाई टीचर्स सायंटिस्ट अवॉर्डसाठी दीप्ती बिस्ट यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
नासाच्या मंगळ ग्रहावर सोडलेल्या यानावर शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचे नाव दीप्ती यांनी इन्स्पायरमध्ये विज्ञान प्रदर्शनात त्यांनी तयार केलेल्या प्रयोगांना राष्ट्रीयस्तरावर निवडण्यात आले. नागपुरातील अपूर्व विज्ञान मेळाव्यात त्या रिसोर्स पर्सन म्हणून जबाबदारी सांभाळतात. नो कास्ट लो कास्ट सायन्सच्या त्या एक्सपर्ट आहेत. अब्दुल कलाम फाउंडेशनच्या फॅमटो सॅटेलाईट लाँचिंगमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांचे नेतृत्व त्यांनी केले होते. खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून भरपूर पैसे घेऊन विज्ञान शिकविले जाते. पण, कमी खर्चातही विज्ञान शिकविता येते. हे दीप्ती बिस्ट यांनी त्यांच्या उदाहरणावरून शिकविले. त्यामुळं दीप्ती यांच्याकडून नागपूर जिल्ह्यातील विज्ञान शिक्षकांनी धडे घेण्याची गरज आहे.