नागपूर : अपूर्व विज्ञान मेळावा (Science Fair) म्हणजे विद्यार्थ्यांसाठी वेगळी अनुभूती, प्रयोगाची संधी, ध्येयनिश्चितीचा मार्ग आणि म्हणूनच विद्यार्थी सातत्याने धडपडत असतात. नागपूर मनपाच्या विविध शाळेतील विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून वैज्ञानिक प्रयोगाच्या माध्यमातून विज्ञानाविषयी माहिती देत आहेत. मेळाव्यामध्ये इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमातील रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित या विषयांतील प्रयोग (experiments) करून दाखविण्यात येत आहेत.
चला मैत्री करूया विज्ञानाशी हे घोषवाक्य यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी धडपडत आहेत. मनपाच्या विविध शाळेतील 200 विद्यार्थी जवळपास 100 प्रयोग करून दाखवत आहेत. सर्व प्रयोग, विज्ञानाचे कठीण नियम सोप्या पद्धतीने समजावून सांगत आहेत. असोसिएशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एजुकेशन (एआरटीबीएसई) यांच्या सहकार्याने झाशी राणी चौक येथील राष्ट्रभाषा भवन येथे अपूर्व विज्ञान मेळावा 19 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत सुरू राहणार आहे.
सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेचे विद्यार्थी विज्ञान शिक्षिका दीप्ती बिस्ट यांच्या मार्गदर्शनात शगुन हरिसिंग चंदेल पंजा टाटा करताना, प्रिया मिश्रा आधी कोणती बॉटल खाली होणार, नीलम मोते ऑटोमिक सायफन, अर्चना पटेल कमी दाबाचा फवारा, देवश्री मिश्रा जास्त दाबाचा फवारा, कलश राजपूत बॉटल शॉवर यासारखे 15 पेक्षा जास्त प्रयोग करून माहिती सांगत आहेत. तसेच विवेकानंदनगर हिंदी उच्च प्राथमिक शाळेतील अनिकेत बैरासी पेंडुलम प्रयोग, मोहन शाहू कॉपर सल्फेट रंग का बदलतो?, सपना कोपर्डे शेंदूर रंग का बदलतो असे विविध प्रयोग करून दाखवत आहेत. सोबतच संजयनगर माध्यमिक शाळेचे लीलेय देशमुख हॅंगरवर फिरणारं कॉईन, कुंदन फाल्गुन पाण्याची रेल्वेगाडी, चतुर चाकोले हथेली मे छेद, दुर्गानगर माध्यमिक शाळेतील साहिल गिरी क्षेत्र आणि दाब यांचं संबंध, श्रेया धाबर्डे रेसोनांस, दत्तात्रयनगर शाळेतील लक्ष्मी शाहू बस थांबते पण आपण नाही, करिष्मा दिनेश शाहू प्रत्यक्ष जनावराचे हृदय दाखवून माहिती दिली.
अपूर्व विज्ञान मेळाव्यात येऊन विज्ञानाच्या संकल्पना सहजतेने समजून घेता येतात. खेळीमेळीच्या वातावरणात रंजक पद्धतीने विज्ञान शिकता येतो. या मेळाव्यात दरवर्षी एक समानता पाहायला मिळते ती म्हणजे सहजता आणि साधेपणा. येथे आल्यानंतर काहीतरी नवीन अनुभव आत्मसात करता येत असून अपूर्व विज्ञान मेळावा दरवर्षी नवी शिकवणून देतो, असे प्रतिपादन निरीचे डॉ. कृष्णा खैरनार यांनी केले. पुढे ते म्हणाले, जेव्हा आम्ही अभ्यास करायचो, त्यावेळी पालकांच्या मदतीशिवाय कोणताही प्रयोग पूर्ण होत नव्हता. मात्र येथील विद्यार्थ्यांनी साकारलेले प्रयोग बघीतल्यानंतर कोणीही सहज विज्ञानाचे प्रयोग तयार करू शकतो.
रिसोर्स पर्सन म्हणून पाटणा येथील मोहम्मद जावेद आलम, मध्य प्रदेशमधून राजनारायण राजोरीया, कोल्हापूरचे रामचंद्र लेले आलेले आहेत. मोहम्मद आलम माती, सूर्यप्रकाशाशिवाय वनस्पतींच्या पोषणाबाबत माहिती देत आहेत. हायड्रोपोनिक्सच्या तत्त्वावर काम करताना, मोहम्मद जावेद आलम यांनी असा जलीय पोषण आहार आणि पद्धत शोधून काढली आहे, ज्याद्वारे सर्व प्रकारची झाडे कुठेही लावता आणि वाढवता येतात. मो. आलम यांनी हे पेटंट आलम जल कृषी विधी आणि बायो-फर्ट-एम पोषक तत्व या नावाने घेतले आहे.