नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाने निर्देश दिले. त्यानुसार नागपूर महापालिकेद्वारे समाज विकास विभागाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सुरू आहे. याअंतर्गत शुक्रवारी 29 जुलै रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये (Suresh Bhat Auditorium) स्वनिधी महोत्सव होणार आहे. या स्वनिधी महोत्सवाविषयी (Self Funding Festival) माहिती देण्यासाठी आणि जास्तीत जास्त पथविक्रेत्यांनी यामध्ये सहभागी व्हावे याबाबत जनजागृती करण्यासाठी मनपाद्वारे विशेष वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या जनजागृती वाहनाला मंगळवारी (ता. 26) आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या (Tirpude College of Social Work) विद्यार्थ्यांनी महोत्सवाची माहिती देणारे पथनाट्य सादर केले.
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत परिसरात कार्यक्रम झाला. यावेळी समाजविकास विभागाचे उपायुक्त विजय हुमने, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह समाजविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जनजागृती वाहनामध्ये एलईडी स्क्रीनची व्यवस्था आहे. यावरून स्वनिधी महोत्सवाची माहिती दिली जात आहे. शहरातील विविध भागांमध्ये जाऊन हे वाहन महोत्सवाच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य करीत आहे. सोबतच तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाचे अबोली कुशवाहा, प्रणव जोल्हे, प्रणव जुमडे, प्राची सिरसाट, रुनीचा पवार, हर्ष संतापे, हर्षा जोगे, सिद्धी पुरी, वैदेही क्षीरसागर, श्रुशीत सिरसाट हे विद्यार्थी पथनाट्याद्वारे जनजागृती सुद्धा करीत आहेत.
पुढील तीन दिवस शहरातील विविध भागांमध्ये पथविक्रेत्यांच्या स्वनिधी महोत्सवातील सहभागासाठी आवाहन केले जाणार आहे. मंगळवारी (ता. 26) मनपामध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती केल्यानंतर संपूर्ण चमूद्वारे सदर फ्रुट बाजार, फुटाळा, गोकुळपेठ बाजार, आयटी पार्क, व्हेरायटी चौक येथे जनजागृती करण्यात आली. बुधवारी 27 जुलै रोजी गणेशपेठ बसस्थानक, कॉटन मार्केट, बडकस चौक, बुधवार बाजार तर गांधीबाग उद्यान, गुरुवारी 28 जुलै रोजी झाडे चौक, कमाल चौक, इंदोरा चौक, जरीपटका, मानकापूर येथे जनजागृती केली जाणार असल्याची माहिती समाजविकास विभागाचे उपायुक्त विजय हुमने यांनी दिली. 1 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान भारतातील 75 शहरांमध्ये पथविक्रेते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकरिता स्वनिधी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. देशातील 75 शहरांमध्ये महाराष्ट्रातील नाशिक, कल्याण-डोंबिवली, मुर्तीजापूर व नागपूर या चार शहरांचा समावेश आहे.