गणेश सोनोने, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, अकोला | 12 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा कंत्राटी पद्धतीवरून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. आता शाळाही कंत्राटी पद्धतीने चालवायला दिल्या जात आहेत. त्यामुळे ज्यांना शाळा दत्तक दिली जात आहे, तो लोक शाळांचा वापर कशाही पद्धतीने करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार हे अकोला दौऱ्यावर आहेत. यावेळी एक सभा पार पडली. या सभेला संबोधित करत असताना शरद पवार यांनी हा हल्ला चढवला.
नगर परिषदेच्या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा दत्तक म्हणून दिल्या जात आहेत. खासगी कंपनीला किंवा व्यक्तींना या शाळा दत्तक दिल्या जात आहेत. शाळा दत्तक मिळाल्याने कंपनीचे मालक त्यात हस्तक्षेप करतात वैयक्तिक कारणासाठी वापर करतात, असा संशय व्यक्त केला तर वावगं ठरू नये. नाशिकमध्ये द्राक्ष मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे तिकडे द्राक्षापासून दारू तयार केली जाते. नाशिकमधील एक शाळा दारू करणाऱ्या कारखान्याला सरकारने दत्तक म्हणून दिली. गेल्या महिन्यात त्या शाळेत कारखान्याच्या मालकाने कार्यक्रम ठेवला. गौतमी पाटील नाव ऐकलंय का? गौतमी पाटील हिचं नृत्य त्या शाळेत झालं. तुम्ही बघा पोरांना काय शिकवायचं? गौतमीचा धडा द्यायचा का?, असा संतप्त सवाल शरद पवार यांनी विचारला आहे.
कुणासाठी करतो? काय करतो? नव्या पिढीवर काय संस्कार करतो? कशासाठी खासगीकरण करतोय? याचं भान राज्यकर्त्यांना राहिलं नाही. भाऊराव पाटील आणि पंजाबराव देशमुखांनी शैक्षणिक संस्था निर्माण करून एक वेगळं चित्र निर्माण केलं. आणि आज गौतमी पाटील हिला नृत्यासाठी बोलावणारे आणि शाळा चालवणारे कुठे? याचा विचार केला पाहिजे, असा हल्ला शरद पवार यांनी चढवला.
हे सरकार शेतीबाबतची चुकीचं धोरणं राबवत आहे. तुमचा जिल्हा शेतीसााठी महत्त्वाचा जिल्हा आहे. कापसाच्या किमती घसरत आहेत. नाशिकसह राज्याच्या काही भागात कांदा घेतला जातो. कांद्यावर या सरकारने 40 टक्के कर लावला. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर टाकून दिला. तीच गोष्ट संत्र्याची आहे. तिच स्थिती कापसाची आहे. हे सर्व चित्र शेती आणि शेतकरी यांच्या भवितव्यासाठी योग्य नाही. त्यासाठी आपल्याला जागरूक व्हावे लागेल, असं सांगतानाच राज्य कुणाच्याही हाती द्या. माझं काही म्हणणं नाही. पण तुमच्या समस्यांकडे कानाडोळा करू नका, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.