भंडारा : शिंदे गट आणि भाजप राज्यात सत्तेत आहे. दोन्ही गटात सर्व काही अलबेल असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, प्रत्यक्षात वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. भाजप नेत्यांना वैतागून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याची धमकी दिली. त्यानंतर भाजपने पालघर, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीवर दावा सांगून शिंदे गटाला आणखी डिवचले. त्यामुळे दोन्ही पक्षात लोकसभा मतदारसंघांवरून धुसफूस सुरू असल्याचं दिसून येत असतानाच आता शिंदे गटानेही भाजपच्या बालेकिल्ल्यावरच दावा सांगितला आहे. एवढेच नव्हे तर हा मतदारसंघ लढण्याचा ठरावही शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
शिंदे गटाने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. शिंदे गटाच्या जिल्हा कार्यकारिणीची काल बैठक झाली. या बैठकीत भंडारा-गोंदियातून निवडणूक लढण्याचा ठराव करण्यात आला. विशेष म्हणजे सध्या या मतदारसंघात भाजपचे सुनील मेंढे हे खासदार आहेत. विद्यमान खासदार असतानाही शिवसेनेकडून अशा पद्धतीचा ठराव घेण्यात आल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. युतीतील जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ नेते घेणार आहेत. असं असताना शिंदे गट परस्पर ठराव कसा काय करतो? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
भंडरा आणि गोंदियातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकत आहे. इतकेच नाही तर गोंदिया जिल्ह्यातही शिवसेनेची संघटनात्मक ताकद आहे. त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ खऱ्या अर्थाने शिवसेनेचा आहे. त्यामुळे या मतदारसंघात आपलाच उमेदवार राहिला पाहिजे, असा ठराव या कार्यकारिणीत करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. आमच्याकडे लोकसभा निवडणूक लढण्यास अनेकजण इच्छुक आहेत, असा दावाही शिंदे गटाने केला आहे.
दरम्यान, शिंदे गटाकडून या मतदारसंघावर दावा सांगण्यात आल्याने दोन्ही पक्षात धुसफूस वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे. हा लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्यानंतरही शिंदे गट या मतदारसंघात भाजपला कितपत मदत करेल याचीही शाश्वती नसल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, शिंदे गट आणि भाजपमध्ये सर्व काही अलबेल असताना भाजपच्या काही नेत्यांनी युतीत मिठाचा खडा टाकल्याचं सांगितलं जात आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवलीतील भाजपच्या काही नेत्यांनी पालघर, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीवर दावा सांगितला होता. त्यामुळे दोन्ही पक्षातील वाद उफाळून आला होता. हा वाद थांबत नाही तोच आता दुसरा वाद उफाळून आला आहे.