विनायक डावरुंग, Tv9 मराठी, नागपूर | 8 डिसेंबर 2023 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची फेरसाक्ष नोंदवली. यावेळी देवदत्त कामत यांनी ठाकरे गटाच्या 22 जून 2022 या तारखेला झालेल्या बैठकीतील ठरावाचा कागद दाखवला. या बैठकीत एक ठराव सर्वानुमते मंजूर झाला होता. या ठरावावर दिलीप लांडे यांची स्वाक्षरी असल्याचा दावा ठाकरे गटाच्या वकिलांनी केला. त्यावर देवदत्त कामत यांनी ती स्वाक्षरी आपली नसून ती खोटी स्वाक्षरी आहे, असं दिलीप लांडे यांनी सांगितलं. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या 22 जूनच्या बैठकीला दिलीप लांडे उपस्थित होते. पण त्या बैठकीबाबत आपल्याला आपल्याला व्हीप दिला नव्हता. तर आमदार संतोष बांगर यांचा फोन आला होता. त्या बैठकीत नेमकं काय ठरलं होतं ते आपल्याला आठवत नाही, असं उत्तर त्यांनी दिलं.
देवदत्त कामत – सध्याच्या महायुतीत नवाब मलिक यांना सामावून घेण्याबाबत आक्षेप नोंदवला होता का?
दिलीप लांडे- ते सरकारमध्ये नाहीत
देवदत्त कामत वकिल : आपला पक्ष आणि शिवसेनेतील पदाधिकारी यांच्यात मोठी नाराजी आहे. पोलिसांचं पोस्टिंग प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये होते. त्याचप्रमाणे तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांचे दाऊद सोबत संबंध होते. या दोन कारणांमुळे पक्षात नाराजी होती. याबद्दल आपली काय माहिती?
दिलिप लांडे : मी याबद्दल माझं मत माझ्या रिप्लायमध्ये दर्शवल आहे. त्या मताशी अद्यापही बांधील आहे.
देवदत्त कामत – 21 जून 2022 जूनच्या पत्रात उपाध्यक्ष यांचा निर्णय होता त्यात असे दर्शवत की उपाध्यक्ष यांनी तो ठराव मान्य केला होता?
लांडे – अशा पत्राबद्दल मला काही माहीती नाही
देवदत्त कामत – आपण शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित होता, कारण सुनील प्रभू यांनी जे पत्र आपल्याला दिले होते ते आपल्याला प्राप्त झालं होतं?
लांडे – मला संतोष बांगर नावाच्या व्यक्तीने फोन केला होता आणि मला बोलावले होते.
कामत – एकनाथ शिंदे हे खरे नेते आहेत, असे म्हणता त्याचवेळी ते विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत असे म्हणत आहात का?
लांडे – राजकीय पक्षाचे आणि विधिमंडळ पक्षाचे
देवदत्त कामत – शिवसेना विधिमंडळ पक्षाचे सदस्य जे बैठकीला उपस्थित नव्हते त्यांना अपात्र करावे असे आधीच ठरलं होतं का?
लांडे – आता मला आठवत नाही
देवदत्त कामत – २१ जूनच्या बैठकीतला ठराव उपाध्यक्षांनी मान्य केला होता. हे खरंय का?
दिलीप लांडे – याबद्दल काही माहिती नाही
देवदत्त कामत- सुनील प्रभू यांचा व्हिप मिळाल्यामुळे तुम्ही 22 जूनच्या बैठकीला हजर होता का?
लांडे – मला संतोष बांगरने फोन केला होता आणि बोलविले होते
देवदत्त कामत – २२ जूनच्या बैठकीला उपस्थित नसणाऱ्या आमदारांना अपात्र करण्याच्या अगोदरच ठरवले गेले होते काय?
दिलीप लांडे – मला आठवत नाही. माझी बाजू शपथपत्रात मांडली आहे
कामत – सुनील प्रभू यांनी सांगितले होतं की काही आमदारांनी आधीच ठरवले होतं, जे आमदार २२ जून २०२२ रोजीच्या बैठकीत अनुपस्थितीत राहतील त्यांना अपात्र ठरवले जाईल. २२ जून २०२२च्या बैठकीत हा प्रस्ताव होता तेव्हा तुम्ही त्यास विरोध केला नाही. हे चूक की बरोबर?
लांडे – प्रतिज्ञापत्रात सादर केल्याप्रमाणे.
कामत – ठरावाखाली अनुमोदक म्हणून आपली सही आहे. हे खरे की खोटे?
लांडे – माझी डुप्लिकेट सही केलेली आहे. ही माझी ओरिजनल सही नाही. माझी बोगस सही केली गेली आहे.
कामत – एकनाथ शिंदे यांना फायदा व्हावा म्हणून तुम्ही ठरावावर खोटी सही केली?
लांडे – हे चूक आहे
कामत – २२ जून २०२२ रोजीचा ठराव, २१ जून २०२१ रोजीच्या हजेरी पत्रकावरील २५ नोव्हेंबरचे कागदपत्रे यांवरील सह्या या एकाच व्यक्तीच्या आहेत, हे सिद्ध होऊ नये म्हणून हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल तुम्ही जोडलेला नाही?
लांडे – मी सहीच केली नाही तर पुरावा घ्यायची गरज नाही.
कामत – पान क्रमांक २२९वर आपलीच सही आहे का?
लांडे – होय
कामत – आपण या कागदपत्रावर स्वाक्षरी कुठे केली?
लांडे – आठवत नाही
कामत – या पानावर आपले नाव आणि मतदारसंघ हा हाताने लिहिलेले आहे. बाकीच्यांचे टाईप केलेले आहे. असे का?
लांडे – मी माझ्या हस्ताक्षरात लिहिले आहे.
कामत – आपले नाव आणि स्वाक्षरी नंतर समाविष्ट केलेले आहे. आपण २० आणि २१ जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेला नव्हता. नंतर तुम्ही त्यांच्यासोबत गेला होता. नंतर तुम्ही सही केली. हे चुकीचे आहे की बरोबर?
लांडे – मी केलेली सही माझ्या हस्ताक्षरात आहे आणि मी केलेली आहे.
कामत – एकनाथ शिंदे यांना भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी आपण पाठिंबा देऊन पक्ष विरोधी कारवाई केली आहे. हे बरोबर आहे का?
लांडे – शिवसेना पक्षाबरोबर भाजपने युती केलेली आहे.
कामत – शिवसेना पक्ष नव्हे तर फक्त एकनाथ शिंदे नेतृत्व करत असलेल्या आमदारांच्या एका गटाने भाजप सोबत सरकार स्थापन केले. हे बरोबर आहे का?
लांडे – शिवसेना आणि भाजपची युती आहे. त्यांचे सरकार आहे.
शिंदे गटाकडूनही लांडे यांना प्रश्न विचारले गेले.
वकील अनील साखरे – तुम्हाला इंग्रजी लिहिता वाचता येतं का?
लांडे – नाही
ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी यावर आक्षेप घेतला. त्यांना सगळं मराठीत समजावलेलं आहे. त्यांनी मान्य केलेलं. मग हे असे प्रश्न आत्ता का विचारले जात आहेत? असा सवाल देवदत्त कामत यांनी केला.
कामत – तो कागद बघा. आपण तो वाचू शकता का ?
लांडे – नाही. मी सुरुवातीलाच सांगितले की मला इंग्रजी वाचता येत नाही
११६ प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर दिलीप लांडे यांची उलटसाक्ष संपली. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांची उलटसाक्ष नोंदवण्याची प्रक्रिया सुरु झाली.