‘बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात पक्षाची घटना पाळली गेली नाही’, राहुल शेवाळे यांचा गंभीर आरोप, सुनावणीला महत्त्वाचं वळण

| Updated on: Dec 12, 2023 | 3:24 PM

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. कारण खासदार राहुल शेवाळे यांनी आपली फेरसाक्ष नोंदवत असताना मोठा दावा केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1999 मध्ये पक्षाची घटना बनवली. पण त्या घटनेचं पालन केलं गेलं नाही. त्यामुळे जुलै 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांची निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मुख्य नेतेपदी निवड झाली, असा मोठा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात पक्षाची घटना पाळली गेली नाही, राहुल शेवाळे यांचा गंभीर आरोप, सुनावणीला महत्त्वाचं वळण
Follow us on

विनायक डावरुंग, Tv9 मराठी, नागपूर | 12 डिसेंबर 2023 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आज शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची फेरसाक्ष नोंदवली. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पक्षाची घटना बनवली. पण त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार पक्षाची घटना पाळली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची जुलै 2022 मध्ये मुख्य नेतापदी घटनादुरुस्ती करण्यात आली. ही घटनादुरुस्ती निवडणूक आयोगाच्या नियमानुसार करण्यात आली, असा मोठा दावा राहुल नार्वेकर यांनी दिला.

नेमके सवाल-जवाब काय?

कामत- यातील अंतर्विरिद १९९९ ची घटना बदलली की नाही?

शेवाळे – १९९९ ला निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बाळासाहेब ठाकरे यांनी घटना बनविली होती. त्यानंतर ती घटना पाळली/फॉलो केली गेली नाही, म्हणून जुलै २०२२ रोजी मुख्य नेता पदाची घटनादुरुस्ती निवडणूक आयोगाच्या नियमानुसार केली.

कामत – घटनेचे पालन केले गेले नाही, याचा अर्थ काय ?

शेवाळे – घटनेनुसारच राष्ट्रीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी सभेच्या बैठका घ्यायला हव्या होत्या. मात्र, दुर्दैवाने या बैठका झाल्या नाहीत, तसेच पक्षांतर्गत कोणत्या निवडणुकाही झाल्या नाहीत.

कामत – तुम्ही चुकीची साक्ष देत आहात की १९९९ मध्ये जेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते तेव्हा आणि नंतर कोणत्या संघटनात्मक निवडणुका झाल्या नाहीत. हे खरे आहे का?

शेवाळे – नाही, हे खरे नाही.

कामत – म्हणजे १९९९ नंतर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार संघटनात्मक निवडणुका झाल्या नाहीत, हे खरे आहे का?

कामत – तुम्ही बाळासाहेबांवर गंभीर आरोप करत आहात की बाळासाहेबांनी १९९९ ते २०१२ या काळात संघटनात्मल निवडणुका घेतल्या नाहीत, हे खरे आहे का?

शेवाळे – नाही, हे खरे नाही.

कामत – १९९९-२०१२ या काळात नियमानुसार संघटनात्मक निवडणुका झाल्या नाहीत?

शेवाळे – आयोगाच्या नियमानुसार या कालावधीत संघटनात्मक निवडणुका झाल्या नाहीत.

कामत – बाळासाहेबांच्या काळात नियमानुसार १९९९-२०१२ या काळात निवडणुका झाल्या, हे खरे आहे का?

शेवाळे – नाही.

कामत – तुम्ही निवडणूक आयोगाच्या नियमांबद्दल बोलत आहात, ते नियम काय आहेत?

शेवाळे – रेकॉर्डवर आहेत.

कामत – तुम्ही दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या घटनेत १९९९ सालापासून जुलै २०२१ पर्यंत कुठलीही दुरुस्ती झाली नाही, हे खरे आहे का?

शेवाळे – होय

कामत – तुमच्या म्हणण्यानुसार पक्षाच्या घटनेत २०१८ साली कथित दुरुस्ती झाल्याचे तुम्हाला कधी कळाले?

शेवाळे – मला माहिती नाही

कामत – जुलै २०२२ साली घटना दुरुस्ती केली तेव्हा तुम्हाला २०१८ सालची घटना दुरुस्ती बद्दल माहिती होती का?

शेवाळे – नाही. मला माहिती नव्हती.

कामत – तुम्हाला शिवसेनेतील घटनेमधील युवासेना प्रमुखपद माहिती आहे का?

शेवाळे – मला युवासेना प्रमुखपद माहिती आहे. पण घटनेतील तरतूद माहिती नाही.

कामत – १९९९सालच्या घटनेत जुलै २०२२ मध्ये केलेल्या दुरुस्ती वेळी २०१८ सालातील घटना दुरुस्ती दाखवली होती का?

शेवाळे – ती १९९९सालातील घटनेत दुरुस्ती ही जुलै २०२२ मध्ये झाली.

कामत – तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्वीटर किंवा एक्सवर फॉलो करता का?

शेवाळे – होय

कामत – तुमचे ट्वीटरवर Rahul Shewale @shewale_rahul या नावाने खाते आहे. हे खरे आहे का?

शेवाळे – मला आठवत नाही.

कामत – २३ जानेवारी २०१८ साली आदित्य ठाकरे यांची युवासेना प्रमुखपदी प्रतिनिधी सभेत निवड झाली होती. हे खरे आहे का?

शेवाळे – हे खरे नाही.

(कामत – साक्षीदाराने आदित्य ठाकरे यांना २३ जानेवारी २०१८ रोजी ट्वीट करत युवासेना प्रमुख पदावर निवड झाल्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या)

कामत – संघटनेच्या निवडणूक झाल्यानंतर तुम्ही हे ट्वीट करत या शुभेच्छा दिल्या होत्या. हे खरे आहे का?

शेवाळे – हे खरे नाही. कारण ठाकरे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आम्ही आदराने नेते म्हणून संबोधित करतो.

कामत – साक्षीदारास त्यांनी २३ जानेवारी २०१८ रोजी केलेले ट्वीट दाखवा.

कामत – “युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेजी यांची शिवसेना नेते पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार “, असे ट्वीट तुम्ही का केले?

शेवाळे – मला आठवत नाही.

कामत – २३ जानेवारी २०१८ रोजी संघटनात्मक निवडणूक झालीच नाही, अशी चुकीची माहिती तुम्ही सुनावणी दरम्यान दिली आहे. हे खरे आहे का?

शेवाळे – नाही, हे खरे नाही.

कामत – अपात्रता याचिकेला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, १८ जुलै २०२२ रोजी झालेल्या प्रतिनिधी सभेत नवीन राष्ट्रीय कार्यकारीणीने घटना दुरुस्तीवर चर्चा करून निर्णय घ्यावा असे म्हटले. हे खरे आहे का?

शेवाळे – होय

कामत – १८ जुलै २०२२ रोजी झालेल्या प्रतिनिधी सभेत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अध्यक्ष म्हणून बोलावले पण ते अनुपस्थित होते, असे या इतिवृत्ताच्या कागदात दिसत आहे. हे खरे आहे का?

शेवाळे – रेकॉर्डवर आहे

कामत – पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे अनुपस्थितीत असतानाच एकनाथ शिंदे हे बैठकीत अध्यक्ष म्हणून काम पाहू शकतात. हे खरे आहे का?

शेवाळे – रेकॉर्डवर आहे

कामत – १८ जुलै २०२२ रोजी झालेल्या प्रतिनिधी सभेच्या इतिवृत्तानुसार जुनी राष्ट्रीय कार्यकारीणी १८ जुलै २०२२ पासून तात्काळ बरखास्त करण्याचा ठराव आला. हे खरे आहे का?

शेवाळे – मला माहिती नाही

कामत – याचा अर्थ १८ जुलै २०२२ पर्यंत बरखास्त केलेली राष्ट्रीय कार्यकारिणी कार्यरत होती. हे खरे आहे का?

शेवाळे – मला माहिती नाही

कामत – याआधी तुम्ही उत्तर देताना प्रतिनिधी सभेत राष्ट्रीय कार्यकारिणीला घटनेत चर्चा करून बदल करण्यास सांगितले होते असे म्हटले आहे. याचा अर्थ १९९९ सालातील घटनेमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीने बदल केला का?

शेवाळे – जी कागदपत्रे मला दाखविली, ती वाचून मी ते उत्तर दिले आहे.

ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांत पुन्हा खडाजंगी झाली. एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या उत्तरावर शेवाळे कसे उत्तर देतील? असा सवाल शिंदे गटाच्या वकिलांनी केला.

(दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या उत्तरावर ठाकरे गटाच्या वकिलांनी राहुल शेवाळे यांना प्रश्न विचारला. राहुल शेवाळे हे शिंदे यांच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयात होते, असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वकिलांनी केला.)

कामत – जुलै २०२२ साली जी घटनादुरुस्ती झाली ती २०१८ सालची घटना आहे, हे खरे आहे का?

शेवाळे – मला माहीत नाही.

कामत – मग असं म्हणायचे आहे की, सर्व प्रतिवाद्यांना हे पक्के माहित होते की, ते २०१८ सालच्या घटनेत दुरुस्ती करत आहेत.

कामत – जुलै २०२२ मधील कथित घटना दुरुस्तीनुसार आजही उद्धव ठाकरे हे पक्षाचे पक्षप्रमुख आहेत. हे खरे आहे का?

शेवाळे – मला माहिती नाही

कामत – तुम्ही सांगितलेल्या २६ जुलै २०२२ रोजी केलेल्या घटनादुरुस्ती नुसार पक्ष प्रमुखाचे अधिकार व कार्य हे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे २६ जुलै २०२२ पर्यंत होते.

शेवाळे – मला माहिती नाही

कामत – तुम्ही दिलेल्या चीफ एक्झॅमिनेशन मध्ये तुम्ही २५ जून २०२२ रोजी शिवसेना भवनमध्ये उपस्थित होत्याचे म्हटले आहे. त्यादिवशी राष्ट्रीय कार्यकारीणी ची बैठक झाली होती का?

शेवाळे – नाही

कामत – वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांनुसार, २५ जून २०२२ रोजी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारीणी बैठक बोलावली होती, हे तुम्हांला माहिती आहे का?

शेवाळे – नाही

(कामत यांच्याकडून वेबसाईटवरील बातमीची प्रिंट आऊट सादर करण्यात आली. यावर शिंदे गटाच्या वकिलांकडून आक्षेप घेण्यात आला. ही वर्तनमानपत्राची प्रत नाही. ही साधी प्रिंट आऊट आहे. ही साधी प्रिंट आऊट आहे. असे पुरावे कसे ग्राह्य धरता येतील, असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केला.)

शेवाळे – माझ्या वाचनात आले नाही

कामत – २५ जून २०२२ रोजी शिवसेना राष्ट्रीय कार्यकारीणी बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करण्यात आला. हे खरे आहे का?

शेवाळे – नाही. हे खरे नाही.

कामत – राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेना खासदारांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांच्या बाजूने मतदान करावे, असे पत्र तुम्ही उद्धव ठाकरे यांना ५ जुलै २०२२ रोजी लिहिले का?

शेवाळे – होय

कामत – हे पत्र तुम्ही पाठवले आहे का?

शेवाळे – होय

कामत – तुम्ही खोटी साक्ष देत आहात, हे बरोबर आहे का?

शेवाळे – नाही. मुळीच नाही.

खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष संपली. १११ प्रश्नांना उत्तरे दिल्यानंतर शेवाळे यांची उलट साक्ष संपली