नागपूर : राज्यातील सर्व पोलिसांना गृह विभागानं (Home Department) अलर्ट दिलाय. पोलिसांना तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती दिलीय. राज्यातील वातावरण अशांत करण्याचा काही घटकांकडून प्रयत्न सुरु आहे. पण स्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. कुठेही समाजा-समाजात संघर्ष होणार नाही, याची काळजी आम्ही घेतो. तीन मेबाबत इंटेलिजन्सकडून (Intelligence) सांप्रदायिक तणाव होणार अशी माहिती आहे का?, असं विचारलं असता दिलीप वळसे पाटील म्हणाले, इंटेलिजन्सकडून असे इनपूट येत असतात. आज तरी तसं काही घडेल असं वाटत नाही. तीन तारखेला तणावाच्या शक्यतेबाबत आज पोलीस महासंचालक (Director General of Police) यांनी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. उद्या मी डीजी सोबत बैठक घेणार आहे. डीजी किंवा पोलीस आयुक्तांकडे इनपूट येत असतात. याबाबत डीजींसोबत उद्या चर्चा करेन. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात तणाव झाल्यास काय होईल, याचा अभ्यास करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर अटकेची मागणी होणारंच. डेसीबलबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री दहाचे सहा लाऊडस्पीकर लावायला प्रतिबंध करण्यात आला आहे. दिवसा भोंगे लावायचे असल्यास डेसीबलची मर्यादा पाळावी लागेल, नाहीतर दंडाची कारवाई होणार आहे. त्यासंदर्भात पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात काही विभाग असे आहेत की जिथे तणाव निर्माण होतात. त्यांची नावं समोर आहेत. पोलीस प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे. कुठल्याही स्थितीला समोरं जायला पोलीस तयार आहेत. राजकीय नेता किंवा कुठल्या संघटनेनं राजकीय तणाव निर्माण केला तर कठोर कारवाई केली जाणार आहे, असंही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.