नागपूर : पालकांनो, तुमचा पाल्या बस किंवा अाॅटोनं शाळेत जात असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता तुमच्या पालकाच्या शाळेत जाण्याचा खर्च वाढणार आहे. एक डिसेंबरपासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरू होणार आहेत. लॉकडाऊनपासून डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. याचा परिणाम वाहतूक खर्चात होणार आहे. स्कूल बस आणि ऑटोचे शुल्क वाढणार आहे.
मार्च २०२० पासून कोरोनाला सुरुवात झाली. तेव्हापासून स्कूल बस घरीच आहेत. या स्कूल बस वाहतुकीला परवडणाऱ्या नाहीत. उदा. आधी पाच किलोमीटरचे आठशे रुपये लागत असतील, तर आता तेवढेच अंतर जायला आता जास्त खर्च लागेल. हा खर्च सामान्य विद्यार्थ्यांच्या पालकांना परवडणारा नाही. शिवाय लॉकडाऊनपूर्वीचे इंधनाचे दर आणि आताचे इंधनाचे दर यात बराच फरक पडला. याचा परिणाम वाहतूक खर्चावर होणार आहे.
दीड वर्षांपासून बंद असलेल्या बसेस या भंगार अवस्थेत आहेत. त्या गाड्या आता वाहतुकीसाठी काढायच्या म्हणजे बॅटरी, टायर, विमा, पासिंग या सर्वांचा खर्च एक लाख रुपयांच्या जवळ जातो. दोन वर्षांपूर्वी डिझेलचा दर ६७ रुपये होता. हा दर आता ९३ रुपये प्रतीलीटर झाला आहे. फायनान्स कंपन्या आता हप्त्यासाठी स्कूल बस मालकाकडं येतील. त्यामुळं या स्कूलबस कशा चालवायच्या असा प्रश्न आता स्कूल बस मालकांना पडला आहे.
गाडी मालक अडचणीत आहेत. त्यामुळं २५ ते ३९ टक्के भाडेवाढीची शक्यता आहे. विद्यार्थी वाहतूक बचाव संघर्ष समिती आता पालकांपर्यंत आपलं म्हणणं स्पष्ट करून सांगणार आहे. त्यात त्यांना कितपत यश मिळते. त्याला पालक कसे रिअॅक्ट होतात, यावर सर्व अवलंबून आहे.
बहुतेक पालकांचे रोजगार हिरावले गेल्यानं ते त्रस्त आहेत. त्यात खासगी शाळांची शुल्क परवडत असल्यानं काही पालकांनी आपल्या पाल्याला जवळच्या शाळेत टाकले आहे. अनुदानित किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांकडं पालकांचा कल वाढतोय. त्यामुळं काॅन्व्हेंटची विद्यार्थीसंख्या कमी होऊ लागली.