नागपूर : छत्रपती संभाजीनगरच्या सभेनंतर, महाविकास आघाडीची दुसरी सभा नागपुरात होतेय. त्यासाठी तयारीही पूर्ण झालीय.
पण पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते अजित पवारांवरुन चर्चा सुरु झाल्यात. अजित पवार नागपुरात सभेला येणार की नाही? यावरुन नागपुरात चर्चा रंगलीय. याआधी संभाजीनगरच्या सभेत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आले नव्हते. मात्र आता अजित पवारांच्या नागपुरातल्या हजेरीवरुन साशंकता व्यक्त करण्यात येतेय. अजित पवार भाजपसोबत जाणार का? असं चर्चेचं वादळ सुरु असताना, नागपुरातल्या सभेवरुन अजित पवारांकडे नजरा लागल्यात.
अजित दादा येणार असं नाना पटोलेही म्हणतायत आणि संजय राऊतही. अजित पवार नागपुरात येणार की नाही? हे काही तासांत स्पष्ट होईल. पण नजरा उद्धव ठाकरेंच्या भाषणावरही असतील. कारण ठाकरे उपुमख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या होम टाऊनमध्ये येत आहेत. गेल्या काही दिवसांत ठाकरे आणि फडणवीसांमध्ये फडतूसवरुन शाब्दिक चकमक झालीय. उद्धव ठाकरे फडतूस गृहमंत्री म्हटल्यानंतर फडणवीसांनी ठाकरेंना काडतूसनं उत्तर दिलं होतं.
सत्तांतरानंतर, ठाकरे गट-काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र सभा घेऊन वातावरण निर्मिती करतेय आणि मराठवाड्यानंतर महाविकास आघाडीनं आपला मोर्चा विदर्भाकडे वळवलाय. नागपुरातली सभा यशस्वी करण्यासाठी तिघांनीही पूर्ण ताकद लावली आणि मैदानाची पाहणीही केलीय. नागपुरातल्या सभेतून उद्धव ठाकरेंची तोफ फडणवीसांवर धडाडणारच आहे. पण नेहमीप्रमाणं, ठाकरेंच्या निशाण्यावर शिंदेंची शिवसेना असेलच.
नागपुरात महाविकास आघाडीची सभा आहे. तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्तानं, अमित शाह मुंबईत आलेत. आप्पासाहेब धर्माधिकारींचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारनं सन्मान करण्यात येणार आहे. मात्र अमित शाह हे महाविकास आघाडीची सभा पाहण्यासाठी आल्याचा टोला राऊतांनी लगावलाय. विदर्भात आधीच शिवसेनेची इतकी ताकद नव्हती. त्यातही शिंदेंच्या बंडामुळं विदर्भात नव्यानं उभारी घेण्याचं आव्हान ठाकरेंसमोर आहे. त्यामुळे ठाकरे नवीन काय बोलतात, याकडे लक्ष असेल.