“कितीही काळ्या मांजरी आडव्या आणल्या तरी नागपुरातील ही सभा होणारच”; ठाकरे गटाने पुन्हा शड्डू ठोकला

| Updated on: Apr 11, 2023 | 9:53 PM

संभाजीनगरची सभा होऊ नये म्हणून त्या ठिकाणी तिथे जातीय दंगल घडवण्यात आली. नागपुरात महाविकास आघाडीची सभा झाल्यानंतर त्यांना धक्का बसणार असल्याने सभेला विरोध करत आहेत अशी वेगवेगळ्या प्रकारची नौटंकी सुरू असल्याचा घणाघात त्यांनी सत्ताधारी शिंदे गटावर केला आहे.

कितीही काळ्या मांजरी आडव्या आणल्या तरी नागपुरातील ही सभा होणारच; ठाकरे गटाने पुन्हा शड्डू ठोकला
Follow us on

नागपूर : ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये पहिली सभा झाली होती. त्यानंतर त्यांनी मालेगावमध्येही तुफान गर्दीत सभा घेतली होती. या दोन्ही सभा झाल्यानंतर त्याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही सभा झाल्या होत्या. तर आता महाविकास आघाडीची आणखी सभा होणार असल्याने आता पुन्हा एकदा राज्याचे लक्ष या सभेकडे लागून राहिले आहे. त्यामुळे या सभेआधी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगत आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सभा नागपूरात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाकरे गटाने आता सभा घेण्याचा जोरदार सपाटा लावला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी या सभा अलोट गर्दीत होत आहे.

ठाकरे गटाने रत्नागिरीतील सभेनंतर मालेगावमध्ये सभा घेऊन सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर सत्ताधारी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रत्नागिरी आणि मालेगावमध्ये सभा घेत ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरे गटाने नागपूरात सभा घेणार असल्याचे ठणकावून सांगितले.

यावेळी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की, नागपुरातील सभा संभाजीनगरपेक्षा जबरदस्त होणार आहे यामध्ये कोणतीही शंका नाही. त्यामुळे या सभेच्या निमित्ताने आता जोरदार ताकद दिसणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळेच सभेपूर्वीच अनेकांच्या पोटात गोळा उठलेला आहे असा जोरदार टोलाही त्यांनी लगावला आहे.

महाविकास आघाडीची ही सभा होणार असल्यामुळेच विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठत असल्यानं सभा होऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

संभाजीनगरची सभा होऊ नये म्हणून त्या ठिकाणी तिथे जातीय दंगल घडवण्यात आली. नागपुरात महाविकास आघाडीची सभा झाल्यानंतर त्यांना धक्का बसणार असल्याने सभेला विरोध करत आहेत अशी वेगवेगळ्या प्रकारची नौटंकी सुरू असल्याचा घणाघात त्यांनी सत्ताधारी शिंदे गटावर केला आहे.

त्यामुळे कितीही काळ्या मांजरी आडव्या आणल्या तरी नागपुरातील ही सभा होणारच आहे. ही सभा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा देणार ही सभा ठरणार असल्याचा विश्वासही विनायक राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.