नागपूर : मौदा तालुक्यातील धानला येथील शेतातील विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. रमेश मदनकर यांची गावापासून एक किलोमीटर अंतरावर शेती आहे. याठिकाणी हा मृतदेह विहिरीत तरंगत होता. या व्यक्तीनं आत्महत्या केली की, कुणी मारून फेकलं याचा तपास पोलीस करीत आहेत.
धानला येथील शेतकरी रमेश मदनकर हे शेतमजूर कार्तिक वैरागडेसह धान काढण्यासाठी 25 डिसेंबरला सकाळी शेतावर गेले. पाणी आणण्यासाठी कार्तिक विहिरीवर गेले. तेव्हा त्यांना विहिरीत मृतदेह तरंगताना दिसला. रमेशनंही मृतदेह शेतातील विहिरीत पाहिला आणि त्याला धक्काच बसला. मौदा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता मेयो रुग्णालयात पाठविला.
मृतकाच्या खिशात निवडणूक कार्ड सापडले. त्यावरून मृतक संजय मनसराम रामटेके असल्याचं कळलं. 48 वर्षीय व्यक्ती असून हिवरी ले-आउट, शास्त्रीनगर येथील रहिवासी आहेत. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार हरीश इंगलवार करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, पोहायला गेलेल्या युवकाचा मोखेबर्डी उपसा सिंचन योजनेच्या कालव्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी चार वाजता सालेभट्टी गावाजवळ घडली. गिरधर राजू भोयर (वय 21) असं मृतकाचं नाव आहे. तो नागपूरजवळील एका खासगी कंपनीत काम करत होता. सालेभट्टी गावाजवळ क्रिकेटचे टुर्नामेंट सुरू आहेत. खेळण्यासाठी काही मुलं गेले होते. दरम्यान, ते पोहायला म्हणून मोखेबर्डी उपसा सिंचन योजनेच्या कालव्यावर गेले. तेव्हा त्यांच्यापैकी एक जण पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. हे पाहून काही खेळाडू परत गेले. माहिती मिळताच गावकऱ्यांनी कॅनलकडं धाव घेतली. तोपर्यंत गिरधरचा मृत्यू झाला होता.