नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्याबाबत माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे (Former Chief Secretary Sitaram Kunte) यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला. सीताराम कुंटे हे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार आहेत. म्हणून त्यांचा खुलासा अधिक गंभीर ठरतो, असं रोखठोक मत भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (BJP leader Chandrasekhar Bavankule) यांनी व्यक्त केलंय. आपल्या माजी मुख्य सचिवाने आणि विद्यमान प्रधान सल्लागाराने आपल्याच सरकारमधील माजी गृहमंत्र्यांबद्दल एवढी स्फोटक माहिती ईडीसारख्या जबाबदार यंत्रणेला दिली. त्यानंतर त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देणे आता आवश्यक झाले आहे. आपल्या प्रधान सल्लागाराने आपल्याच सरकारमधील एका सहयोगी पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे अशी जगजाहीर केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माननीय शरद पवार साहेबांना काय उत्तर देतील?, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री श्री. @AnilDeshmukhNCP यांच्याबाबत खळबळजनक गौप्यस्फोट करणारे सीताराम कुंटे हे माजी मुख्य सचिव असले तरी सध्या ते मा. मुख्यमंत्री श्री. @OfficeofUT यांचे प्रधान सल्लागार आहेत. म्हणून त्यांचा खुलासा अधिक गंभीर ठरतो.
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) January 29, 2022
पोलिसांच्या बदल्यांत माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे हस्तक्षेप करीत होते. अशी कबुली राज्याचे माजी सचिव सीताराम कुंटे यांनी दिली. सात डिसेंबर रोजी ईडीने कुंटे यांचा जबाब नोंदवला गेला. देशमुख यांनी पोलिसांच्या बदल्यामध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. कुंटे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राज्याच्या मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांची मुख्यमंत्री सचिवालयाच्या प्रधान सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली.
सीताराम कुंटे यांनी दिलेल्या जबाबात संबंधित पोलीस अधिकाऱ्याची कुठे आणि कोणत्या पदावर बदली करायची, हे संबंधित यादीत नमूद केले असायचे, असे सांगितलं. देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांच्यामार्फत या अनधिकृत याद्या दिल्या जात होत्या. देशमुख यांच्या हाताखाली काम करत असल्यानं त्यांना नकार देऊ शकत नव्हतो, अशी कबुली कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात दिली आहे. आता सीताराम कुंटे हे मुख्यमंत्र्यांचे सल्लागार आहेत. त्यामुळं या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.