नागपूर : नागपूर पोलीस गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या पर्समधून होणाऱ्या चोऱ्यांमुळं त्रस्त होते. चोराचा पत्ता लागत नव्हता. पण, आता याप्रकरणी एका महिला चोराला त्यांनी अटक केली. कारण जाणून घेतले असता पोलीसही चक्रावले.
ही युवती होस्टेलवर राहायची. पण, घरून मिळालेल्या पैशांवर मौज करता येत नव्हती. त्यामुळं तिने चोरीचा धंदा सुरू केला. काही महिलांबरोबर तिने चोरीला सुरुवात केली. त्यानंतर हिस्सेवाटणीवर वाद निर्माण झाला. ही काही कमी नव्हती. त्यानंतर या तरुणीने स्वतः चोरी करण्याचा व्यवसाय सुरू केला.
आतापर्यंत तिने वीस ठिकाणी चोऱ्या केल्या. या चोरीच्या रकमेतून तिने मौजमजा केली. दागिने लपवून ठेवले. दागिने विक्रीसाठी गेल्यास सोनार आपले बिंग फोडेल, अशी भीती तिला होता. त्यामुळं तिने दागिन्याच्या वस्तू लपवून ठेवल्या होत्या.
तिचे लग्न जुळले होते. परंतु, ती चोरी करत असल्याची बाब समोरच्या पार्टीला माहीत झाली. त्यामुळं तिचे लग्न तुटले. सीताबर्डी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी तिला अटक केली. तेव्ही तू चांगल्या घरची आहे. उच्च शिक्षित आहे. मग, चोरी कशाला करते, असे विचारण्यात आले. त्यावर तुम्हाला नाही कळणार, साहेब अशी म्हणून ती मोकळी झाली.
ही तरुणी आहे सत्तावीस वर्षांची. तिच्या घरची परिस्थिती तशी सधन. दोन विषयांत ती एम.ए. झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तीनं चोरी केली. त्यानंतर या चोरीची तिला सवयच झाली. गर्दीच्या ठिकाणी जाते. महिलांच्या पर्समधून रोख रक्कम लंपास करते. अशाच प्रकारचे गुन्हे घडत असल्यानं पोलीस त्रस्त झाले होते. अशाप्रकारे तिने वीस चोऱ्यांची आता कबुली दिली आहे.