नागपूर : शहरात 283 तर ग्रामीण भागात 108 मशिदीत आज पहाटे फजरची नमाज झालीय. पण काही मशिदीत आज भोंग्यांचा आवाज कमी होता. नागपुरातील सर्वात मोठी जामा मशीद (Jama Masjid) येथे सकाळच्या नमाजच्या वेळेस भोंग्याचा आवाज कमी होता. सध्या नागपुरातील जामा मशीद परिसरात शांतता आहे. पोलिसांची परवानगी घेऊन मनसेने हनुमान चालिसा म्हणावा, जर पोलीस परवानगी घेतली नाही तर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मुस्लीम समाजाची भावना आहे. एकंदरित नागपुरातील जामा मशिदीसह इतर मशिदीमध्ये भोंगे कायम होते. नियमानुसार आवाज कमी करून अजान झाली. मनसेच्या अल्टिमेटमला (MNS ultimatum) न जुमानता अजान झाली. पहाटेच्या वेळी भोंगे वाजले. पण, आवाजाची मर्यादा (noise limit) पाळल्याचं दिसून आलं.
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील मशिदीसमोर हनुमान चालिसा लावणार असल्याचा निर्णय जिल्ह्यातील मनसेच्या वतीने घेण्यात आला होता. त्यामुळे आज सकाळी 5 वाजताची अजान होण्याच्या प्रतीक्षेत मनसे कार्यकर्ते चिखली येथील मशिदीसमोर वाट बघत उभे होते. मात्र आज सकाळची अजान भोंग्यातून झालीच नाही. यावेळी मनसेच्या वतीने मशिदीसमोर भोंगे ठेवण्यात आले होते. ते मात्र मशिदीवरील अजान न झाल्याने हनुमान चालिसा भोंग्यावर वाजवता आली नाही. त्यामुळं मनसे कार्यकर्ते परतले.
ज्या ठिकाणी मशिदीवर भोंगे वाजतील त्या ठिकाणी हनुमान चालिसा लावण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार सव्वापाच वाजता वाशिम शहरातील जामा मशिदीवर अजान वेळी भोंगे लावले होते. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हनुमान मंदिरात भोंगे लावून हनुमान चालिसा लावला. दुपारी दीड वाजता आजनच्या वेळी भोंगे लावले तर पुन्हा आम्ही हनुमान मंदिरात चालिसा लावून जश्यास तसे उत्तर देऊ असे जिल्हा अध्यक्ष मनीष डांगे यांनी सांगितलं. एकंदरित विदर्भात पहाटेची अजान झाली पण, काही ठिकाणी भोंगे वाजले. काही ठिकाणी आवाजाची मर्यादा कमी केली होती. तर काही मशिदीसमोर भोंगे वाचलेच नाहीत. फारसा काही गोंधळ झाला नाही.