नागपूर : सरकारी नोकरीचे आमिष देऊन फसविल्याची घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. गुप्तचर संस्थेत नोकरी लावून देण्याची थाप एका ठगबाजानं मारली. त्यासाठी वेळोवेळी सव्वापाच लाख रुपये उखडले. राजस्थानातील मोहनसिंग राव (वय 25) असं त्या ठगबाजाचं नाव. तर, सुभाषनगरातील शशिकांत बंसोड (वय 30) हा त्याला बळी पडला.
शशिकांत हा उच्चशिक्षित आहे. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये त्यानं परीक्षा दिली. मित्राच्या वडिलांच्या ओळखीतून त्यानं एका दलालाशी संपर्क केला. मोहनसिंगनं गुप्तचर संस्थेत नोकरी लावून देण्याची थाप मारली. त्यासाठी वेळोवेळी एक लाख, दोन लाख असं करून सव्वापाच लाख वसूल केले. ही रक्कम 9 फेब्रुवारी 2021 ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत मोहनसिंगनं घेतली. मोहनसिंग हा राजस्थानातील रतनसागर इथला रहिवासी आहे. त्याचा आमिषाला शशिकांत बळी पडला.
वेळोवेळी पैसे घेतले. पण, कुठल्याही प्रकारची नोकरी मिळाली नाही. या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शशिकांतनं प्रतापनगर पोलिसांना तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भवरसिंग याच्याविरोधात कलम 420, 406 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
शशिकांत हे एक प्रकरण आहे. मोहनसिंगनं अशाप्रकारे बऱ्याच जणांना फसविल्याची शक्यता आहे. पोलीस आता कामाला लागले आहेत. वशिबाजीनं नोकरी लागते, असं काही जणांना वाटतं. त्याला ते बळी पडतात. सरकारी नियमानुसार पात्रता आणि संबंधित परीक्षा देऊनच नोकरी मिळते. हे आयती नोकरी पाहणाऱ्या युवकांना केव्हा कळणार, हे काही समजत नाही.
प्रतापनगर पोलिस ठाणे हद्दीत घरफोडीची घटना तीन डिसेंबर रोजी उघडकीस आली. घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्याने घरातून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून एकूण १ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. २४ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान आनंद बोवाडे (वय ७४) हे कुटुंबीयांसह घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. यादरम्यान, अज्ञात चोराने दरवाजाचा कडी-कोंड्याचे स्क्रू काढले आणि घरात प्रवेश केला. दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.