नागपूर : शहरातील लिटिल वंडर दहा वर्षीय काव्य अग्रवालने (Kavya Agarwal) काही विक्रम रचले आहेत. काव्यने किडटास्टिक (kidtastic) नावाची भगवद् गीता (the Bhagavad Gita) लिहिली. असे करणारा काव्य हा सर्वात छोटा लेखक बनला आहे. किडटास्टिकमध्ये, काव्यने भगवद् गीतेच्या श्लोकांचा अर्थ सांगितला आहे. अध्यायांचे स्वतःच्या शब्दात भाषांतर केले आहे. प्रत्येक अध्यायातून काव्य काय शिकला हेदेखील लिहिले आहे.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना काव्य म्हणाला की, लहान वयातच भगवद्गीतेबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याकडे कल होता. नंतर भगवद्गीतेवरील कार्यशाळा पूर्ण केली. त्यामुळं संस्कृत श्लोक शिकण्यास आणि वाचण्यास आणि भगवद्गीतेचे विविध आयाम समजून घेऊन संशोधन करण्यास प्रेरित झालो. आई-वडील आणि आजी-आजोबांच्या पाठिंब्यामुळे मला पुस्तक लिहिण्यास प्रोत्साहन मिळाले. मी जिथे जातो तिथे आपल्या भगवान श्रीकृष्णाची मूर्ती सोबत घेऊन जातो. मी मूर्तीशी एक जवळीक साधली आहे आणि माझा असा विश्वास आहे की मूर्ती मला आयुष्यात चांगले काम करण्यासाठी प्रेरित करते.
काव्य म्हणाला, स्वतःच्या व्हिज्युअलायझेशनद्वारे पुस्तकाच्या डिझाइनमध्ये योगदान दिले आहे. पुस्तक वाचताना मुलांची आवड लक्षात घेऊन काव्यने रंगीबेरंगी चित्रे, भगवान कृष्णाच्या कथा आणि रंगरंगोटीची जागा समाविष्ट केली आहे.
भगवद्गीता आणि भगवान कृष्ण हे माझी प्रेरणा आहे. मला मार्गदर्शन करण्यात आणि पुस्तक लिहिण्यात या पवित्र धार्मिक ग्रंथाचा मोलाचा वाटा आहे. भगवद्गीता ही जगभरातील मानवांच्या समस्यांवर उपाय आहे. माझे आई-वडील रश्मी अग्रवाल आणि राज अग्रवाल यांनी मला माझ्या सर्व उपक्रमांमध्ये साथ दिली. तसेच आजोबा महेश आणि आजी मीना अग्रवाल आणि आजी-आजोबा अनिता आणि महेंद्र अग्रवाल हे माझ्या संस्कृत आणि शास्त्रांकडे असलेला कल बघता अतिशय आनंदी आहेत.
काव्य उत्कृष्ट चित्रकार आहे. बंगाल बोर्डाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये तो विजयी झाला आहे. बंगाल बोर्डातून शास्त्रीय संगीताची परीक्षाही त्याने दिली आणि जिंकली. काव्य गिटार खूप छान वाजवतो. काव्य सार्वजनिक वक्ता आहे. इंग्रजी भाषेवर त्याचे चांगले प्रभुत्व आहे. काव्य संस्कृत श्लोक आणि कवितेचे सादरीकरण करतो. तो योगाचा राष्ट्रीय विजेता देखील आहे.
सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट पुणे द्वारा ग्रोथ आयकॉन. हा पुरस्कार भगवद् गीता या ग्रंथाशी संबंधित आहे. संस्कृत राष्ट्रीय ऑलिम्पियाड, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र आणि 25 हजारांचे रोख पारितोषिक मिळाले. संस्कृत श्लोक पठणासाठी इंडिया स्टार आयकॉन किड्स अचिव्हर अवॉर्ड प्राप्त झाला. ऑक्सफर्ड बिग रीड, जागतिक विजेता. यामध्ये काव्यला आयपॅड देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षी याच स्पर्धेत तो उपविजेता ठरला होता.