नागपूर : येथील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दील अजब घटना घडली. दारुड्यांनी यथेच्च दारू ढोकसली. त्यानंतर बारच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी बिल दिले. बिल का मागितले म्हणून मद्यपींनी टेबल, खुर्च्यांची तोडफोड केली. त्यानंतर पेट्रोल टाकून बार पेटविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
रविनगर चौकात उडीपी बार अँड रेस्टॉरंट आहे. असलम कलाम शेख (वय ३१) आणि रहिम शेख (वय ३२) हे दोघेही या बारमध्ये दारू पिण्यासाठी आले. शनिवारी दुपारची ही घटना. सुमारे अर्धा तास त्यांनी दारुवर यथेच्च ताव मारला. एक लाओ, दुसरा लाओ, असे म्हणून मस्त दारु ढोकसली. ती त्यांना चांगलीच लागली. तेवढ्यात वेटरनं त्यांना बिल मागितले. त्यामुळं चढलेल्या दोघांचीही चांगलीच आग झाली. त्यांनी बारमधील खुर्च्यांची फेकाफेक सुरू केली.
असलमनं तर सीपीयू, मॉनिटर खाली आदळून फोडले. शिवाय बिअरच्या बॉक्सची तोडफोड करून नुकसान केले. असलमनं खिशातील बॉटल काढली. त्या बॉटलमध्ये दारू नसून पेट्रोल होते. ते टेबल-खुर्च्यांवर फेकले. त्यानंतर टेबल-खुर्च्या पेटविण्याचा प्रयत्न केला. बारच्या कर्मचाऱ्यांची धावाधाव झाली. त्यांनी बाजूनं पाणी आणले. लागलेली आग विझवली. यामुळं बारमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. मग कर्मचारीही एकवटले. त्यांनी आरोपींची चांगलीच धुलाई केली. त्यानंतर त्यांची नशा उतरली. झिंग जरा कमी झाली.
घटनेची माहिती अंबाझरी पोलिसांना देण्यात आली. पीएसआय शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींना ताब्यात घेतले. बार संचालक वसंतकुमार बेथरिया यांनी तक्रार नोंदवली. अंबाझरी पोलिसांनी असलम आणि रहिम शेखविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यानंतर कुठे बारमालकानं सुटकेचा निःश्वास सोडला. तरीही ज्याला झिंग येईल, अशांकडून आता बिलाचे पैसे मागायचे असतील, तर जरा सावध होण्याची वेळ आली आहे.