प्रदीप कापसे, नागपूर : विधीमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरुय. हिवाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरु झालाय. अधिवेशनाच्या या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहातील वातावरण चांगलंच तापलं. सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील आजच्या विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी झाले. त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांचं विधान परिषदेतील आजचं भाषण चांगलंच गाजलं. या सगळ्या घडामोडींनंतर आता रात्र होत आली तरीसुद्धा नागपुरात राजकीय घडामोडी काही कमी होताना दिसत नाहीयत. कारण शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या गोटात हालचालींना वेग आलाय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या पक्षाच्या आमदारांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीला ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, अनिल परब, सुनील प्रभू, सुनील शिंदे, सचिन अहिर, कैलास पाटील, राजन साळवी, कैलास पाटील, अंबादास दानवे, निलम गोरे, उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात शिंदे गटाकडून दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा छेडत विधानसभेत एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली. भाजपच्या अनेक आमदारांनी ही मागणी लावून धरली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास एसआयटीच्या माध्यमातून होईल, असं घोषित केलं.
देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन प्रकरणी एसआयटी चौकशीच्या माध्यमातून तपास करणार असल्याचं जाहीर करणं हा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासाठी धक्का मानला जात होता. कारण आदित्य ठाकरे यांच्यावर या प्रकरणावरुन गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर विधानसभेत त्याचे पडसाद उमटले होते.
विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने उद्धव ठाकरे सतर्क झाले आहेत. ते रविवारी रात्री मुंबईहून नागपूरच्या दिशेला निघाले. विशेष म्हणजे ते आपल्या पक्षातील दिग्गज नेत्यांच्या फौजेसह नागपुरात काल रात्री उशिरा दाखल झाले. त्यानंतर आज उद्धव ठाकरे विधान परिषदेत अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी झाले.
उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी झाल्यानंतर आपल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीत ठाकरे कदाचित सरकारला घेरण्यासाठी रणनीती आखण्याबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे उद्धव ठाकरे नेमकं ज्या कामासाठी आले ते काम पूर्ण करण्यासाठी रणनीती आखण्याबाबतची चर्चा या बैठकीत होणार असल्याची शक्यता आहे.