‘अमित शाह बंद दाराआडचे धंदे सोडा, हिंमत असेल तर…’, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

| Updated on: Sep 29, 2024 | 8:27 PM

"अमित शाह चार दिवसांपूर्वी नागपुरात येऊन गेले. बंददाराआड चर्चा. काय चर्चा? उद्धव ठाकरेला संपवा. शरद पवारांना संपवा. त्यांचा पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा, बुथ लेव्हलचे कार्यकर्ते फोडा. अहो, अमित शाह हे बंद दाराआडचे धंदे सोडा. हिंमत असेल तर मैदानात या. शिवरायांच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करुन दाखवा?", असं चॅलेंज उद्धव ठाकरे यांनी दिलं.

अमित शाह बंद दाराआडचे धंदे सोडा, हिंमत असेल तर..., उद्धव ठाकरे यांचा घणाघात
अमित शाह आणि उद्धव ठाकरे
Follow us on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपवर सडकून टीका केली. “ज्याला मी बाजारबुनगा म्हटलं ते आठ-दहा दिवसांपूर्वी नागपुरात येऊन गेले. कोण येऊन गेले? त्यांचं दुर्दैवं असं आहे की? दोन महिन्यांपूर्वी ते पुण्यात येऊन गेले, थोड्या दिवसांत माझा नेमका पुण्यातच कार्यक्रम. ठोकलं तिकडे. ते तिकडे मला म्हणाले होते की, उद्धव ठाकरे औरंगजेब फॅनक्लबचे संस्थापक. मी औरंगजेब फॅनक्लबचा संस्थापक असेल तर तुम्ही अब्दाली आहात, अहमद शाह अब्दाली. चार दिवसांपूर्वी नागपुरात येऊन गेले. बंददाराआड चर्चा. काय चर्चा? उद्धव ठाकरेला संपवा. शरद पवारांना संपवा. त्यांचा पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा, बुथ लेव्हलचे कार्यकर्ते फोडा. अहो, अमित शाह हे बंद दाराआडचे धंदे सोडा. हिंमत असेल तर मैदानात या. शिवरायांच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करुन दाखवा?”, असं चॅलेंज उद्धव ठाकरे यांनी दिलं.

“जे मी पुण्यात बोललो होतो, हे बाजार बुनगे येतात आणि महाराष्ट्राला गुलाम करण्याची भाषा करतात. शिवसेना संपवा? अरे संपवायचं असेल तर या. तुमच्या किती पिढ्या उतरतात ते मी बघतो. शिवसेना का संपवायची? आम्ही तर तुमच्याचबरोबर होतो. आज माझ्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आहेत. पण आम्ही तुमच्यासोबत होतो ना? आम्ही 25 ते 30 वर्षे हिंदुत्वच्या मुद्द्यावरुन सोबत राहिलो. मग 2014 मध्ये दिल्लीत तुमचा पंतप्रधान बसल्यावर काय झालं होतं?”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘महाराष्ट्र गिळायचा प्रयत्न केला तर कोथळा बाहेर येतो’

“एकनाथ खडसे यांनी सांगितलेली ही गोष्ट आहे आणि ती खरी आहे. विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीवेळी अंतिम टप्प्यात जागावाटप आलं होतं. दोन-पाच जागा इकडेतिकडे राहिल्या होत्या. खडसेंचा फोन आला की, उद्धवजी आता बस झालं. आम्हाला नाही वाटत की, आता युती पुढे टिकावी. मी म्हटलं, काय झालं? दोन-चार जागांचा प्रश्न संपवून टाकू. तर खडसे म्हणाले की, नाही, नाही, बस, मला वरुन सांगण्यात आलं आहे की, आता आपली युती तुटली. 15 दिवसांत युती तुटली आणि 63 जागा निवडून आल्या. त्यानंतर त्यांना समजलं की, महाराष्ट्र गिळायचा प्रयत्न केला तर कोथळा बाहेर येतो”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

‘मोहनजी ते तुम्हाला मान्य आहे का?’

“आम्ही म्हणजे मुनगंटीवार नाहीत. बोलतात काय आणि करतात काय, जातात कुठे. त्यांनी युती तेव्हा तोडली होती. त्यांनी 2019 साली देखील तेच केलं. 25 ते 30 वर्षात तुमच्यासोबत राहून शिवसेनेचा भाजप झाला नाही, तर मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असल्यावर काँग्रेस कसा होणार? म्हणजे माझ्यासोबत असला की साधू संत. दुसऱ्याकडे गेला तर चोर. हे तुमचं हिंदुत्व कुठलं. भाजपचं हिंदुत्व थोतांड आहे. नागपूर हे संघाचं मुख्यालय आहे. मी मोहनजींना विचारतो की, आम्ही तुम्हाला हवेत की नको ते सोडा. पण ज्या पद्धतीने भाजप हिंदुत्वाचा थयथयाट करत आहेत ते तुम्हाला मान्य आहे का? भ्रष्टाचारी आणि इतरांना घेतलं जात आहे?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.