दिनेश दुखंडे, नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगाने घडामोडी घडत आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे संबंधित प्रकरणावरुन विधानसभेत गदारोळ झालाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी समिती स्थापन करुन त्या समितीमार्फत चौकशी होईल, असं घोषित केलंय. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत आता आदित्य ठाकरे यांच्या समर्थनासाठी ठाकरे गटही कामाला लागला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: आपल्या शिष्टमंडळासह नागपुरात पुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची फौज नागपुरात दाखल होणार आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई नागपुरात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे आपल्या निकटवर्तींयासह आज रात्री उशीरा मुंबईहून नागपुरात दाखल होतील.
गेल्या आठवड्यात दिशा सालियन मृत्य प्रकरणात शिंदे-फडणवीस सरकारने आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर आणि वरुण सरदेसाई नागपुरात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
राहुल शेवाळे यांचे आधी लोकसभेत आरोप
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आधी लोकसभेत आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करत गंभीर आरोप केले होते. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावर त्यांनी आरोप केले होते.
सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला AU नावाचे 43 कॉल आले होते. बिहार पोलिसांनी तपास केला असता तो नंबर AU म्हणजे आदित्य उद्धव असा नावाचा अर्थ येत होता, असा दावा राहुल शेवाळे यांनी केला होता.
राहुल शेवाळे यांच्या आरोपांवर ठाकरे गटाच्या खासदारांनी आक्षेप घेतल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी शेवाळे यांचं विधान लोकसभेच्या कामकाजातून वगळलं होतं. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी विधानसभेत त्याचे पडसाद उमटले होते.