नागपूर : महाराष्ट्रात सत्तांतर होऊन सहा महिने झाले असले तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अद्यापही प्रत्यक्षात समोरासमोर आलेले नाहीत. ते समोरासमोर आल्यानंतर परस्परांशी काय बोलतात, त्यांचे हायभाव काय असतील? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर येऊ शकतात असा अंदाज बांधला जात होता. कारण उद्धव ठाकरे गेल्या आठवड्यात अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात दाखल झाले होते. पण ते विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी झाले नव्हते. त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर ते पुन्हा मुंबईत परतले होते. पण आता उद्या पुन्हा कदाचित उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोज येण्याची दाट शक्यता असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.
नागपुरात आज हिवाळी अधिवेशनात एक नवी गोष्ट बघायला मिळाली. ती म्हणजे विधान परिषदेच्या कामकाजात आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: सहभागी झाले. त्यांनी विधान परिषदेत महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरुन एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर सडकून टीका केली.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच अधिवेशनात सहभागी झाले. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे अधिवेशनात सहभागी झाले पण नेमकं त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनाला दांडी मारली. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. एकनाथ शिंदे यांना एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी दिल्लीला जावं लागलं. पण संबंधित कार्यक्रम आटोपून एकनाथ शिंदे पुन्हा नागपुरात दाखल झाले आहेत.
एकनाथ शिंदे उद्या पुन्हा अधिवेशनात सहभागी होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आजच्या सारखंच उद्यादेखील अधिवेशनात सहभागी झाले तर महाराष्ट्रातील जनतेला ज्या दिवसाची प्रतिक्षा आहे तो दिवस उद्या उजाडू शकतो. महाराष्ट्राचे आजी-माजी मुख्यमंत्री उद्या समोरासमोर येऊ शकतात. ते समोर आल्यानंतर एकमेकांशी कसा संवाद साधतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विरोधकांनी महाराष्ट्राच्या तीन मंत्र्यांना घेरलं
दरम्यान, विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून दुसरा आठवडा सुरु झालाय. अधिवेशनचा पहिला आठवडा चांगलाच गाजला. पहिल्या आठवड्यात विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नेस्को भूखंड घोटाळ्यावरुन घेरण्याचा प्रयत्न करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मागणीसाठी विरोधकांनी सभात्यागही केला होता.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी विरोधकांनी फोन टॅपिंग प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विरोधकांनी आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जमीन लाटण्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अधिवेशन नेहमीप्रमाणे गाजताना दिसत आहे.