केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात आयोजित श्री विश्व व्याख्यानमाला या कार्यक्रमात भाषण करताना जोरदार फटकेबाजी केली. “मी जवळपास 45 वर्षे झाले राजकारणात आहे. मी कोणाच्या गळ्यात हार घालत नाही. मला सवय नाही. 45 वर्षात माझ्या स्वागताला कोणी येत नाही आणि कोणी सोडायला येत नाही. मी नेहमी म्हणायचो माझ्या स्वागताला कुत्राही येत नाही, पण आता कुत्रा यायला लागला. कारण झेड प्लस कॅटेगिरीमध्ये माझी सिक्युरिटी आहे म्हणून मी जायच्या आधी कुत्रा फिरून येतो. कोणी पोस्टरही लावत नाही आणि बॅनरही लावत नाही”, असं नितीन गडकरी म्हणाले.
“मी लोकांनाही सांगितलं, मत द्यायचं असेल तर द्या नाही दिलं तरी काही हरकत नाही. मी तुमचं काम करत राहीन. जातीयवाद कराल तर माझ्याकडे यायचं नाही. मी पब्लिकली सांगितलं, जो करेंगे जात की बात उसको कसके मारुंगा लाथ. मला काही फरक पडला नाही. देणाऱ्यांनी मला मते दिली”, असं नितीन गडकरी म्हणाले. “आपलं आयुर्वेद आहे, आपलं विज्ञान त्याला तुम्ही डायलूशन करू नका. आपण जे टिकवून ठेवलं आहे त्यावर संशोधन करा. गुणात्मक परिवर्तन करून ट्रान्सपरन्सीने त्याला योग्य निदान करा”, असंही गडकरी यावेळी म्हणाले.
“वसुधैव कुटुंबकम् म्हणजेच विश्वाचं कल्याण. आपल्या संस्कृतीत कुठेच असं म्हटलं नाही की, पहिले माझं कल्याण, माझ्या मुलांचं कल्याण नंतर माझ्या मित्रांचं कल्याण, असं नाही. राजकारणात मात्र म्हणतात. काही लोक माझ्या पोराचं पहिले कल्याण करा, त्याला तिकीट द्या, बाकी काही झालं तरी चालेल. माझ्या पोराला तिकीट द्या, माझ्या बायकोला तिकीट द्या, हे का बर चालते कारण लोक त्यांना मत देतात. ज्या दिवशी लोक ठरवतील हे जे वारसा हक्काने आलेलं आहे त्यांना आम्ही मतदान करणार नाही. त्या दिवशी ते सरळ येतील”, अशी फटकेबाजी नितीन गडकरी यांनी केली.
“कोणाचा मुलगा मुलगी राहणार काही कोणाचा पुण्य नाही किंवा पापही नाही. पण त्यांनी स्वत:ला सिद्ध केले पाहिजे आणि लोकांनी म्हटलं पाहिजे की, तुमच्या मुलाला उभं करा. तसं आपल्या विज्ञानाला आपल्या लोकांनी रेकॉग्नाइझ करून ते आपल्याकडे आलं पाहिजे आणि मला वाटतं ते शक्य आहे”, असं नितीन गडकरी म्हणाले.