नागपूर : कापड उद्योजकांच्या दबावाला सरकारनं बळी पडू नये, असं पत्र शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलंय. कापूस निर्यात बंदी आणि सूत निर्यातीवर निर्यातकर न लावणे हे दोन्ही निर्णय सरकारनं घेऊ नये, अशी मागणी जावंधिया यांनी या पत्रातून केली आहे.
शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रानुसार, यंदा जगभरात कापसाचं पीक कमी आलंय. यंदा अमेरिकेच्या बाजारात कापसाचे भाव एक डॉलर 20 सेंट व एक डॉलर 27 सेंट प्रती पाउंडपर्यंत वाढले. रुपयात हा भाव 70 हजार रुपये प्रती खंडी होतो. भारताच्या बाजारात शेतकर्यांना 8 ते 9 हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. मात्र, हे भाव कमी करण्यासाठी कापड उद्योजकांच्या संघटनेनं केंद्र सरकारला कापसाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी केली, असे जावंधिया म्हणाले.
सुताच्या निर्यातीवर निर्यातकर लावण्यात यावे, अशी मागणीही विजय जावंधिया यांनी केली आहे. या माहितीनेच बाजारात कापसाच्या दरात 500 ते 600 रुपये प्रती क्विंटलची मंदी आली असल्याचे जावंधिया यांनी सांगितलं. कापड उद्योजकांद्वारे कापसाची आयात करून कापसाचे भाव कमी करणे शक्य नसल्याने ते कापसावर निर्यात बंदीची मागणी करीत असल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.
2011 मध्ये अमेरिकेच्या बाजारात दोन डॉलर 40 सेंट प्रती पाउंड रुईचे भाव कमी झाले होते. तेव्हा भारतात 60 हजार रुपये प्रती खंडी रुईचा भाव होता. तेव्हा केंद्रातील तत्कालीन सरकारने कापूस निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असताना आपण या निर्णयाचा विरोध केला होता, अशी आठवण जावंधिया यांनी या पत्रातून पंतप्रधानांना करून दिली आहे. पिके कमजोर असताना चांगला भाव देऊन त्याची पूर्तता सरकारने करावी, अशी शेतकर्यांची अपेक्षा असते, असं जावंधिया यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रातून म्हटलंय.
विदर्भात कापसाचं पीक घेतलं जातं. वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम ते दमदापूर पट्ट्यात यंदा रोगानं कापसाचं पीक कमी झालं. कापूस वेचणाऱ्यांनी भाव वाढवून मागितला. उत्पादन कमी असल्यानं उत्पन्न फारसे झालं नाही. त्यामुळं कापूस उत्पादकाच्या डोळ्यात यंदा पाणी आलं आहे.
वाघानं घेतला महिला वनरक्षकाचा बळी, ताडोबातील कोअर झोनमधील घटना