मुंबई : कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, जसे निकाल अपेक्षित होते तसे आले आहेत. 106 आमदार बरोबरीचं काम राज्यात झालं आहे. कुणी छाती बडवून घेत असेल तर त्यांना लखलाभ असो. चार नगरपंचायतींमध्ये काँग्रेसला बहुमत मिळत असल्याची स्थिती आहे. आमदारांच्या तुलनेत आम्ही चार नंबर वरच आहोत. पण आजचे निकाल आल्यावर आम्ही पण दोन नंबरच्या बरोबरीने आहोत, हे स्पष्ट होईल, असंही वडेट्टीवार यांनी ठासून सांगितलं. ते म्हणाले, ग्रामीण भागात काँग्रेसचं वर्चस्व होत आणि राहील हा संदेश सुद्धा जनतेने दिला आहे. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण भाजपने आपलं वर्चस्व वाढवलं होतं. पण आता ते कमी करण्यात आम्हाला यश आले आहे. विदर्भात सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. भाजपपेक्षा मोठा पक्ष हा काँग्रेस राहिला आहे. विदर्भ जेव्हा ताकदीने काँग्रेसच्या बरोबर उभा राहत असतो तेव्हा सत्तांतर होत असते.
आज जो कल दिसतो आहे हा कल भाजपला पुढचे पाच वर्षे सत्तेपासून दूर नेणारा आहे. या निवडणुका पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा पाया आहे. आता हा बेस मजबूत होत आहे. काँग्रेस हा जुना पक्ष आहे इतर जे पक्ष आहेत ते काँग्रेसमधून निर्माण झाले आहेत. काँग्रेसच्या मतांचे लोक आहेत ज्यांचं मतभेद झाले आणि त्यातून हे पक्ष निर्माण झाले आहेत, असे वडेट्टीवार यांनी सांगितलं. महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. येणाऱ्या दिवसात काँग्रेस मजबुतीने उभा राहील. या निकालाने पक्षाला ऊर्जा मिळाली आहे. राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात 100 जागा मिळाल्या असतील तर आम्हाला ही 60 जागा मिळाल्या आहेत. ते 60 टक्केच्यावर आम्ही पण आहोतच. येणाऱ्या दिवसात महापालिका निवडणुकीत पार्टी हायकमांडने सांगितलं की एकटं लढा तर एकटं लढू. आघाडीत लढा तर आघाडीत लढू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्र्यांची कामगिरी श्रेष्ठ आहे. त्यामुळे हे निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. आम्ही विश्वासाने लढलो. जिथे ज्या पक्षाची संख्या जास्त आहेत तिथे त्या पक्षाचा अध्यक्ष करायचा महाविकास आघाडीत निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री घरात बसले हे म्हणणं चुकीचं आहे. कारण त्यांच्या कामाचा संदेश जनतेपर्यंत जात असतो. या निकालात मुख्यमंत्र्यांचा वाटा मोठा आहे. नीटमध्ये 27 टक्के आरक्षण मिळालं पाहिजे. धन दांडग्यांची पोर पुढे जात असतात. पण उपेक्षित गरीब विद्यार्थ्याला पुढे जात येत नाही. आम्हाला संधी मिळावी हे आम्ही देशाच्या पंतप्रधानांकडे मागणी केली होती. पण ते ओबीसी असूनसुद्धा त्यांनी लक्ष दिले नाही, असा आरोप वडेट्टीवार यांनी लावला.
आम्ही भोगलाय आम्हाला कुणी सांगू नये की आम्ही काय करतोय. आज केबिनेटमध्ये सुध्दा ओबीसी आरक्षणावर चर्चा होईल. आमच्याकडे डाटा नव्हता. आम्ही इकडून तिकडून काही संस्थांचा डाटा गोळा केला. गोखले संस्थेचा आधार आम्ही ओबीसी हे 27 टक्केच्या वर आहेत हे कोर्टात दाखवण्यासाठी आधार घेतला. आम्ही पूर्ण आधार घेतला नाही. सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल ही आम्हाला अपेक्षा आहे.
ओबीसींच्या जागांवर आम्ही ओबीसी उमेदवार दिला. कोर्टाचा निकाल उद्या काय येईल ते आम्हाला माहीत नाही. पण सर्व पक्ष ठरवतील आणि त्या जागेवर ओबीसी उमेदवार देतील नाही तर ओबीसी त्यांचा बदला घेतील, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिलाय.