गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 21 ऑक्टोबर 2023 : कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. कंत्राटी भरतीचा निर्णय आमचा नव्हताच. ते काँग्रेस सरकारचं धोरण होतं. हे आमचं पाप नाही, असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्यात येत असल्याचं जाहीर केलं. फडणवीस यांच्या या दाव्यानंतर आता पुन्हा एकदा आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. याच मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारा दावा केला आहे. त्यामुळे कंत्राटी भरतीवरून येत्या काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आणखीनच जुंपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कंत्राटी भरतीवरून महत्त्वाचे दावे केले आहेत. जीआर निघाला त्यावेळी भाजप विरोधी पक्षात होता. भाजपने त्या जीआरचा त्यावेळी का विरोध केला नाही? मूग गिळून का बसले? कारण कंपन्या स्वत:च्या होत्या म्हणून का? तुम्ही त्यात वाटेकरी होते म्हणून का? असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आम्ही संघर्ष केला. रस्त्यावर उतरलो त्यामुळेच सरकारने माघार घेतली. ही सरकारची नामुष्की आहे, असा हल्लाही विजय वडेट्टीवार यांनी चढवला आहे.
तुम्ही अडीच वर्षापासून सत्तेत आहात. मग अडीच वर्षात जीआर रद्द करण्याचा निर्णय का घेतला नाही? कॅबिनेटमध्ये दुरुस्ती का केली? तुम्हीच तो जीआर पुढे घेऊन जात होता. हे ओपन आहे. अशोक चव्हाण असो की पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातील कंत्राटी भरतीचा जीआर केवळ 15 संवर्गासाठी होता. मर्यादीत होता. तो जीआर बदलून तुमच्या सरकारने 134 संवर्गासाठी केला. म्हणजे मोठ्या प्रमाणावर कंत्राटी भरती करण्याचा निर्णय तुम्हीच घेतला. त्यामुळे यांनी नाक घासले पाहिजे, असा मोठा गौप्यस्फोट वडेट्टीवार यांनी केला.
राज्य सरकार डिसेंबरच्या आत एक लाख पदे भरणार होते. तयारी झाली होती. आमच्याकडे त्याची सर्व माहिती आहे. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरलो. त्यावेळी आम्ही जीआरची होळी करण्याचं आवाहन केलं. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मुळावर उठणारा हा निर्णय असल्याने विद्यार्थी आणि तरूण आंदोलन करू लागले. रस्त्यावर उतरले. सरकार घाबरलं. त्यामुळे जीआर रद्द केला. ही सरकारची नामुष्की आहे. सरकारची माघार आहे. या सरकारचा घुमजाव आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
सरकारने आधीच हा जीआर का रद्द केला नाही? असा सवाल त्यांनी केला. भाजपने नाक घासून प्रायश्चित केलं पाहिजे. भाजप नाक घासण्याचं आंदोलन करत आहे. ते बरोबर आहे. त्यांनी केलेल्या पापातून मुक्ती मागत आहेत. ते आंदोलन करत असतील तर बेरोजगारांच्या व्यथा समजल्या असेल असं समजतो. त्यांनी जोडे मारायचे तर स्वत:लाच मारून घ्यावेत. या राज्यात 70 हजार मेगा पदांची भरती कोणी केली? का भरती केली नाही? आता तातडीने शिक्षक पदापासून इतर भरती करणार होता, का केली नाही? असा सवाल त्यांनी केला.