सुनील ढगे, Tv9 प्रतिनिधी | 12 फेब्रुवारी 2024 : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसचे राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हे धक्कादायक, दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे. जे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांना दुःख वाटतं. राहुल गांधी काँग्रेसला उभारी देण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. त्यांच्या पाठीत आपण खंजीर खुपसणं योग्य नाही. अशा वाईट वेळी तुम्ही हे जाणून घ्यायला पाहिजे की तुम्हाला आऊट ऑफ वे जाऊन काँग्रेस पक्षाने पदं दिली. मुख्यमंत्रीपद दिलं. असं एकही पद नाही जे अशोक चव्हाण यांना देण्यात आलं नाही. अशावेळेस अशा माणसांनी पक्ष सोडून जाणं हे योग्य नाही. पण हरकत नाही काँग्रेसचा कार्यकर्ता पक्षासोबत आहे”, असं विलास मुत्तेमवार म्हणाले.
“हे भाजपच्या राज्यात होत आहे. पक्ष वाढवण्यासाठी दुसऱ्या पक्षातील नेते आणायचे आणि आपला पक्ष मोठा करायचा आणि म्हणायचं आपकी बार 400 पार. मात्र असं होणार नाही. जनता याना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. याच्यापूर्वीही हे झालेलं नाही. आता ही परंपरा सुरू केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना तोडली. उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत राष्ट्रवादी तोडली. नागालँड सोबत इतर राज्यात सुद्धा त्यांनी पक्ष तोडले. हे जे यांनी सुरू केलं यामुळे भाजप मजबूत होऊ शकत नाही. यांनी ही कुठली पद्धत सुरू केली? हे लोकशाहीच्या विरोधात काम आहे”, अशी प्रतिक्रिया मुत्तेमवार यांनी दिली.
“2008 मध्ये विलासराव देशमुख यांच्यानंतर इतर सीनियर लोक असताना सुद्धा यांना मुख्यमंत्री केलं. तेव्हा त्यांचं वय 40-42 होतं. हे त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे होतं की, आपल्याला मुख्यमंत्री केलं, प्रदेशाध्यक्ष केलं, वर्किंग कमिटीमध्ये घेतलं. हे त्यांनी कसं विसरायचं? त्यांचे वडील दोनदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. ज्या परिवाराला एवढं सगळं मिळालं त्या परिवाराने असं करणं योग्य नाही”, अशी टीका विलास मु्त्तेमावर यांनी केली.
“अनेक कार्यकर्ते लाईनमध्ये असताना त्यांना काही मिळत नाही. ते पक्षासोबत उभे राहतात, अनेक केसेस लावून घेतात. हे फार फिक्के लोक आहेत. त्यांच्यामुळे काँग्रेस संपू शकत नाही. याआधीही अनेक जण काँग्रेस सोडून गेले तरी काँग्रेस उभी राहिली आहे. अशोक चव्हाण गेले म्हणून काँग्रेस संपली असं होत नाही”, असं विलास मुत्तेमवार म्हणाले.
“कोणताही माणूस अध्यक्ष म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून परिपूर्ण नसतो. त्याच्यात उणिवा असतात. त्यावर चर्चा करून मार्ग काढायचे असतात. वरिष्ठांकडे तक्रार करण्याचे मार्ग उघडे असतात. पक्षामध्ये अशा पद्धती असतात. या राज्यात हे गेले इतर राज्यात सुद्धा लोक जात आहेत. मग त्याला काय नाना पटोले जबाबदार आहेत का? अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी अनेक निर्णय चुकवले. त्यांनी शंभर टक्के कोणाला दिला आहे का?”, असे सवाल विलास मुत्तेमवार यांनी केले.