सुनील ढगे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर: संत्रा आणि संत्र्यांच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपुरात (nagpur) आज नवीन विक्रम घडणार आहे. प्रसिद्ध शेफ मनोहर विष्णू (manohar vishnu) हे आज नवा विक्रम रचणार आहेत. मनोहर विष्णू हे आज एकाच कढईत एक दोन किलोचा नव्हेतर दोन हजार किलोंचा चिवडा (Mahachivada) बनवणार आहेत. त्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे अवघ्या काही तासातच मनोहर विष्णू यांच्या नावावर नवा विक्रम नोंदवला जाणार असून त्याकडे संपूर्ण नागपूरचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण चिवडा आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ म्हणून दिला जाणार आहे.
प्रसिद्ध शेफ विष्ण मनोहर यांनी चिवडा बनविण्यास सुरुवात केली आहे. दोन हजार किलोंचा ते चिवडा बनवणार आहेत. त्यासाठीची सर्व सामुग्री आणलेली आहे. विष्णू मनोहर यांनी स्वत: हा चिवडा बनवायला घेतला असून त्यांची पाककृती पाहण्यासाठी शेकडो लोकांनी या परिसरात गर्दी केली आहे.
विष्णू मनोहर यांनी सोबत काही मदतनीस घेतले आहेत. त्यांच्या मदतीने ही पाककृती सुरू आहे. मोठ्या गॅसवर महाकाय कढई ठेवून त्यात कढी पत्ता, मसाले, शेंगदाणे, खोबरं आणि इतर मसाले सामुग्री टाकली जात आहे. हा मसाला स्वत: विष्णू मनोहर ढवळताना दिसत आहेत.
विष्णू मनोहर यांची ही पाककृती अनेकांना भुरळ घालताना दिसत आहे. अनेकजण ही पाककृती पाहताना त्याचे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावरही शेअर करताना दिसत आहेत. तर काही लोक या ठिकाणी सेल्फी घेतानाही दिसत आहेत.
खाद्य दिनाच्या निमित्ताने हा चिवडा तयार केला जात आहे. हा चिवडा तयार झाल्यानंतर तो विकण्यात येणार नाही. हा चिवडा गडचिरोली आणि मेळघाटच्या दुर्गम भागातील आदिवासींना दिवाळी फराळ म्हणून वाटप केला जाणार आहे. चिवड्यांचे पाकिटं तयार करून ते वितरीत केले जाणार आहेत. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या सौभाग्यवती कांचन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते या चिवड्याचं वितरण केलं जाणार आहे.
नागपुरात पहिल्यांदाच महाचिवडा तयार केला जात आहे. या निमित्ताने विष्णू मनोहर आणि नागपूरच्या नावावरही नवा विक्रम प्रस्थापित होणार आहे. त्यामुळे नागपूरकरांमध्ये मोठं कुतुहूल निर्माण झालं आहे.
हा चिवडा तयार करण्यासाठी मध्यप्रदेशातील उज्जैन येथून 600 किलो चिवडी आणण्यात आली आहे. त्याशिवाय 350 किलो शेंगदाणा तेल, 100 किलो शेंगदाणे, 100 काजू आणि किसमिस, 50 खोबऱ्याच्या वाट्या, डाळी, हिंग आणि जिरे पावडर प्रत्येकी 15 किलो, मिरची पावडर 40, कढीपत्ता व सांभार, वाळलेले कांदे 50 किलो आणि धने पावडर 40 किलो चिवडा तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत.