नागपूर : या देशात इतर राज्यात कुणीच नाहीये का जिथं सेंट्रल एजन्सी जाऊन चौकशी करेल. तिथे तपास करेल. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस (Shiv Sena and Trinamool Congress) हे टार्गेटवर का आहेत, असा सवाल शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी विचारला. सरकारला पाडण्यासाठी हे सगळं चाललंय, असा थेट आरोप राऊत यांनी केलाय. सरकार अस्थिर करण्यासाठी कट रचला जातोय. आयटी आणि इडीला पन्नास नावं पाठवली आहेत. वेळोवेळी सांगितलंय. पण तरीही इडी आणि आयटीला त्याचं गांभीर्य वाटत नाही. संसदेतला एक जबाबदार माणूस हे सगळं सांगतो. तर त्यावर दखल घ्यावी, असं केंद्रीय यंत्रणांना (central system) का वाटत नाहीये, असा सवाल त्यांनी विचारला.
शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, किरीट सोमय्यांनी एका केंद्रीय मंत्र्याच्या बाबत शंभर बोगस कंपन्यांची लिस्ट दिली आहे. कुणी ढवांगळे म्हणून आहे. भाजपच्या अजूनही जवळचे असतील. त्यांच्या 75 बोगस कंपन्यांची लिस्ट मी स्वतः पाठवली. त्याचं काय झालं, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. देशात सगळ्यात जास्त ईडीच्या धाडी या राज्यात होतायत. महाराष्ट्रात 14 प्रमुख लोकांवर कारवाई केली जातेय. प. बंगालमध्ये 60 लोकांवर झाली आहे, असंही राऊत म्हणाले.
खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरचे ढवांगळे यांचं भाजप कनेक्शन असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. ढवंगाळे हे संजय राऊत यांच्या टार्गेटवर आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ढवांगळे यांना राज्य सरकारचे कंत्राट मिळत होते. हे कंत्राट आयटी विभागाची संबंधित असल्याचे बोलले जाते. ढवांगळे हे नागपुरातील नंदनवन भागात राहत असल्याची माहिती आहे. ढवंगाळे यांचे भाजपशी कनेक्शन असल्यानं ते राऊतांच्या टार्गेटवर असल्याचे बोलले जाते.