नागपूर : जिल्ह्यातील उमरेडमध्ये वाघाचा मृत्यू झालाय. मात्र, वाघाचे सर्व अवयव शाबूत आहेत. वाघाची हाडे मोडलेली दिसून येतात. त्यामुळं या वाघाचा मृत्यू कसा झाला, असे याचा शोध आता वनविभाग घेत आहे.
मानोरा शिवारात सोमवारी रात्री हा वाघ मृतावस्थेत सापडला. महेश पोपटकर यांच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत हा वाघ होता. मंगळवारी सकाळी वनविभागाच्या चमूनं घटनास्थळी भेट दिली. तेव्हा वाघाची कातडी, नखे, सुळे दात, इतर दात, पाय, शेपूट पूर्णपणे शाबूत आहेत. तसेच कातडी व बाहेरील अंगावर कुठलेही विद्युत प्रवाहाच्या खुणा नाहीत.
विजेच्या धक्क्यानंही या वाघाचा मृत्यू झाला नसावा. वाघाच्या उजव्या बाजूचे हाड मोडलेले दिसून येते. यावरून झटापट, विषाणुजन्य रोगामुळे किंवा सर्पदंशामुळे वाघ दगावलेला असावा, असा अंदाज आहे. हा अंदाज नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा यांनी व्यक्त केलाय. वर्षभरापूर्वा वाघांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा अंदाज व्यक्त केलाय.
16 नोव्हेंबरला करांडला परिसरात हा वाघ दिसला होता. उमरेड-करांडला परिसरातच त्याचा वावर होता. गेल्या काही दिवसांपूर्वी शिवारात गायीची शिकारही याच वाघानं केल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळं या वाघाचा मृत्यू कसा झाला, हे वनविभागाचे अधिकारी आता शोधून काढणार आहेत.
दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रात वाघाच्या आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. हा वाघ नर असून तो 8 ते 9 वर्षांचा होता. राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या आधारभूत मानक प्रणालीनुसार पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासमक्ष कार्यवाही पार पाडली. त्यानंतर मृत वाघाच्या शरीराचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी उमरेड, डॉ. समर्थ, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. बिलाल अली व डॉ. लियाकत खान यांनी केले.
याप्रकरणी उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर, डॉ. भारतसिंह हाडा, विभागीय वन अधिकारी (दक्षता), नागपूर वनवृत्त, नागपूर प्रितमसिंग कोडापे, सहायक वनसंरक्षक (जंकास -2), उमरेड, नरेंद्र चांदेवार आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर व राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरण यांचे प्रतिनिधी अविनाश लोंढे, मानद वन्यजीव संरक्षक, निखिल कातोरे यांच्यासमक्ष कार्यवाही पार पाडली.