गजानन उमाटे, शाहिद पठाण
नागपूर-गोंदिया : रेतीला बांधकामासाठी मागणी आहे. पण, परवानगीशिवाय रेतीचा उपसा केला जाऊ शकत नाही. तरीही काही कंत्राटदार आधी रेतीचा उपसा करतात. त्यानंतर परवानगी घेतात. अशांना नागपूरचे जिल्हाधिकारी परवानगी देणार काय, असा प्रश्न पडत आहे. दुसरीकडं गोंदियात मात्र, रेतीची तस्करी होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी रेतीघाटांवर कर्मचाऱ्यांसोबत पाहारा देत आहेत.
नागपूर जिल्ह्यात पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून कोट्यवधी रुपयांची रेती साठवण्यात आली. बेकायदा साठवलेली रेती उचलण्याचे परवाने मिळवण्यासाठी रेतीतस्करांची लगबग सुरू आहे. बेकायदा साठवलेली रेती उचलायला नागपूर जिल्हाधिकारी परवानगी देणार काय असा प्रश्न पडतो. नियमानुसार नदीपात्रापासून पाच किमी दूर रेतीसाठा करणं आवश्यक आहे. अनेक रेती घाटांवर नदीपात्राशेजारीच रेती साठवली जाते. राज्य सरकारच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची चोरी होत आहे.
गोंदियाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रात्रीच्या वेळी वाळू घाटांवर पहारा देतात. वाळू चोरीवर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ही अनोखी शक्कल लढविली आहे. प्रत्येक घाटावर दहा कर्मचाऱ्यांची चमू पाहारा देणार आहे. गोंदिया जिल्ह्यात रात्रीच्या वेळी वाळू घटनांवरून होणाऱ्या वाळू चोरीला आळा घालण्यासाठी गोंदिया जिल्हा प्रशासनाने अनोखी शक्कल लढविली आहे. रस्त्यावर उतरून वाळूचे ट्रक अडविण्याऐवजी वाळू घाटावरूनच वाळू माफियांना वाळूची उचल करू देऊ नये, यासाठी आता महसूल विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी कामाला लागले आहेत. तसेच जिल्हाधिकारी स्वतः रात्रीच्या वेळी वाळू घाटावर पहारा देणार आहेत. याची सुरवात गोंदियाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केली आहे. स्वतः खवले यांनी कर्मचाऱ्यांसह वाळू घाटावर रात्रभर पहारा दिला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील वाळूला विदर्भात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदी, वाघ नदी, पांगोली या नद्या वाहत आहेत. या नदीमधील वाळू बारीक व पांढरी शुभ्र आहे. वाळूची मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र सध्याच्या घडीला जिह्यातील वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत. त्यामुळे वाळू माफिया रात्रीच्या वेळी वाळू चोरी करीत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत असल्याने या वाळू माफियांवर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. आता जिल्ह्यातील वाळू घाटांवर रात्रीच्या वेळी पहारा देण्यात येत असल्यानं वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील मोठ्या घटनांवर यावेळी महसूल कर्मचाऱ्यासह पोलीस असे दहा लोकांची एक चमू पहारा देणार आहे. असल्याने वाळू चोरीवर आळा बसेल. सोबतच शासनाच्या महसुलात वाढ होईल, असा आशावाद अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले व मंडळ अधिकारी राजेश बोडके यांनी व्यक्त केला.