नवी मुंबई : नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, ही मागली आता जोर धरु लागली आहे. नवी मुंबई, पनवेल, कल्याण, ठाणे, रायगड या भागातील भूमिपुत्र या मागणीसाठी आंदोलन उभारत आहेत. या आंदोलनाला राज्यभरातील विविध संघटना आणि पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यात आता वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे नावही समाविष्ट झाले आहे. कारण नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव द्यायला हवे, अशी मागणी मांडली आहे. (Name Navi Mumbai International Airport after D B Patil; Prakash Ambedkar’s demand)
नवी मुंबई मध्ये अंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. या विमानतळासाठी रायगड जिल्ह्यातील उलवे कोपर, पनवेल या पट्ट्यातील मूळ रहिवासी आणि भूमिपुत्र असलेल्या आगरी-कोळी बांधवांनी जमीन दिली आहे. या नागरिकांनी इथलेच भूमिपुत्र असलेल्या दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे अशी जोरदार मागणी केलेली आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नवी मुंबईच्या इतिहासात दि. बा. पाटील यांचे बहुमोल असे योगदान राहिले आहे. नवी मुंबई साठी ज्या भूमिपुत्रांनी जमीन दिली, त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी जो लढा झाला, त्याचे नेतृत्व दिबांनी केले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात देखील दिबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
ओबीसींच्या जागृती व हक्कांसाठी संघटित झालेल्या ओबीसी चळवळीचे ते लढाऊ नेते होते. पनवेलचे नगराध्यक्षपद भूषवलेल्या दि. बा. पाटील यांनी लोकसभेत त्यांनी चार वेळेस रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद भूषविले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपुत्रांची समाज भूषण दिबांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी अत्यंत रास्त आणि न्याय्य आहे. पूर्वजांकडून मिळालेल्या प्राणप्रिय जमिनी विमानतळासाठी दान देणाऱ्या भूमिपुत्रांच्या भावनांची कदर राज्यकर्त्यांनी केली पाहिजे. त्यामुळे नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport – NMIA)दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी ठाणे, रायगड, पालघरमधील स्थानिक भूमीपुत्रांनी मांडली आहे. या आग्रही मागणीला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याची आज अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
संबंधित बातम्या
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याची आग्रही मागणी, रायगड ते नवी मुंबई मानवी साखळी
(Name Navi Mumbai International Airport after D B Patil; Prakash Ambedkar’s demand)