राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा तडकाफडकी रद्द का झाला? नाना पटोले यांनी सांगितलं कारण

| Updated on: Oct 04, 2024 | 10:23 PM

राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर येऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार होते. पण त्यांचा दौरा अचानक ऐनवेळी रद्द करण्यात आला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. राहुल गांधी यांचा दौरा रद्द होण्यामागील कारण आता समोर आलं आहे. नाना पटोले यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा तडकाफडकी रद्द का झाला? नाना पटोले यांनी सांगितलं कारण
राहुल गांधी, काँग्रेस नेते
Image Credit source: Facebook
Follow us on

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज कोल्हापूर दौरा तडकाफडकी रद्द करण्यात आला. राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर येऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार होते. पण त्यांचा दौरा अचानक ऐनवेळी रद्द करण्यात आला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी यांचा दौरा रद्द होण्यामागील कारण सांगितलं आहे. “विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने राहुल गांधी विमानतळावरून पुन्हा परतले. मात्र उद्या सकाळी साडेआठ वाजता ते कोल्हापुरात दाखल होतील”, असं नाना पटोले यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी महायुती सरकारवरही निशाणा साधला.

“महाराष्ट्रात राज्यातलं सरकार हे दिवाळखोर सरकार आहे. योजनांची पूर्तता आणि कामगारांचे पगार करण्यासाठी या सरकारने 30000 कोटी रुपयांचं कर्ज घेतलेलं आहे. याचा अर्थ महाराष्ट्राचा दिवाळ काढण्यामध्ये शिंदे सरकार म्हणजे भाजप प्रणित सरकारला यश आलेलं आहे. सत्ताधारी पक्षातीलच आमदार मंत्रालयात जाळ्यांवर उड्या मारत आहेत, म्हणजे सत्ताधारी पक्षातील आमदार सरकार विरोधात बंड करत असतील तर या सरकारची लायकी काय आहे हे स्पष्ट होत आहे”, असा घणाघात नाना पटोले यांनी केला.

“शाहू महाराजांच्या या भूमीला देशालाच नाहीतर जगाला एक दिशा दिलेली आहे. महिलांचा सन्मान सर्व जाती-धर्माला एकत्र घेऊन चालण्याचा संदेश याच भूमीने दिला. मात्र आज महाराष्ट्रात समता राहिलेले नाही, महिला सुरक्षित नाहीत. एक वर्षात 64 हजार महिला बेपत्ता झालेले आहेत. मात्र याचं उत्तर सरकार देऊ शकत नाही. यामुळे त्यांचेच आमदार त्यांच्या विरोधात बंड करताना पाहत आहोत. शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्यात या सरकारने कोणतेही कसर सोडलेली नाही”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

‘यापुढे आम्ही सत्तेत येणार नाही म्हणून…’

“सरकारचे जे काही एक-दोन कॅबिनेट राहिले आहेत या कॅबिनेट बैठकीत जेवढे शक्य असेल तेवढी त्या सरकारला लूट करायची आहे. यापुढे आम्ही सत्तेत येणार नाही म्हणून या महाराष्ट्राची लूट करायची, लिलाव करायचा अशी परिस्थिती या सरकारची आहे. एखादी घटना घडली तर आम्ही त्यावर बोलतो. मात्र इथे रोजच अशा पद्धतीचे घटना घडत आहेत. हा निर्णयाचा आणि लोक हिताचा धडाका नाही हा स्वतः साठी श्रेय घेण्याचा धडाका आहे. महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तनाची लाट आहे आणि आमची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्राच्या हितासाठी अनेक निर्णय आम्हाला घ्यावे लागणार आहेत”, असं नाना पटोले म्हणाले.