मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राज्यपालांनी पत्र पाठवत ट्विस्ट आणल्यानंतर या अधिवेशनात होणारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक महाविकास आघाडी सरकारला रद्द करावी लागली आहे. मात्र ही निवडणूक आता फेब्रुवारीत होणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. तसेच राज्यपालांनी संविधानिक पदाचा मान राखावा, त्यांनी राजकारण करून नये, असेही नाना पटोले म्हणाले आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडीवरून अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आल्याचेही दिसून आले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अध्यक्ष निवडणार
ही निवडणूक फेब्रुवारीत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. नाना पटोले यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून विधानसभा अध्यक्षांची निवड होणे बाकी आहे. महाविकास आघाडी सरकारने या अधिवेशनात जोर लावत, विधानसभा अध्यक्ष निवडीची तयारी केली होती, मात्र राज्यपालांच्या पत्राने महाविकास आघाडीच्या तयारीवर पाणी फिरले आहे. राज्यात पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष दिसून आला आहे.
घटनात्मक पेच टाळण्यासाठी निर्णय
राज्यपालांचं मत डावलून निवडणूक घेतल्यास त्यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते. राष्ट्रपती राजवटीही लावल्या जाऊ शकते. त्यामुळे ही निवडणूक घेऊ नका, असं आघाडीतील काही नेत्यांचं म्हणणं पडलं. त्यामुळेही घटनात्मक पेचप्रसंग आणि राष्ट्रपती राजवटीची बला टाळण्यासाठी आघाडीने दोन पावलं मागे जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.
भाजपची मागणी काय?
विधानसभा अध्यक्ष निवडीचे मतदान गुप्त मतदान पद्धतीने घ्यावी अशी भाजपची मागणी आहे. महाविकास आघाडी सरकारला त्यांच्या सदस्यांवर विश्वास नाही? गुप्त पद्धतीने मतदान घेण्यास सरकार का घाबरत आहे? असा सवालही भाजपकडून विचारण्यात येत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला कौल मिळाल्यानंतर भाजप विधानसभा अध्यक्ष निवडीच्या निवडणुकीतही सरकारला आव्हान देत आहे.