राजीव गिरी, नांदेड : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागतात. सर्वच राजकीय पक्ष नव्या जोमाने तयारीला लागलेत. महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकीय भूकंपानंतर आता स्थानिक पातळीपासूनची सगळीच समीकरणं बदलली आहेत. त्यातच महाराष्ट्राच्या राजकारणात आता नव्या भिडूची चर्चा आहे. तेलंगणाचा भारत राष्ट्र समिती (BRS Party) अर्थात BRS पक्ष महाराष्ट्रात प्रवेश करतोय. एक-एक करून चर्चेत असलेल्या चेहऱ्यांना हा पक्ष आपल्या गळाला लावतोय. संभाजीनगरातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यानंतर आता नांदेडचे नेते यशपाल भिंगेदेखील बीआरएसमध्ये शामिल झाल्याचं वृत्त उघड झालं आहे. नांदेडचे शेतकरी चळवळीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नेते शंकरअण्णा धोंडगे हेदेखील लवकरच बीआरएसमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
यशपाल भिंगे यांच्याकडून पाच वर्षात तिसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलेले यशपाल भिंगे आता बीआरएस पक्षात दाखल झाले आहेत. मध्यंतरी भिंगे हे राष्ट्रवादीच्या गोटात गेले होते.
विशेष म्हणजे, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत त्यांचं नाव आलं होतं. राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीत राष्ट्रवादीने भिंगे यांच्या नावाची शिफारस केली होती, मात्र तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांच्या वादात ही बारा आमदारांची नियुक्ती झाली नाही. त्यानंतर भिंगे यांनी आता थेट तेलंगणा राज्यातील बीआरएस पक्षाशी घरोबा केलाय. हैद्राबाद इथे जाऊन त्यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीआरएस पक्षात प्रवेश केलाय. अवघ्या चार वर्षांत तीन पक्ष बदलल्याने भिंगे यांच्यावर सोशल मीडियावर चर्चा रंगलीय.
व्यवसायाने प्राध्यापक असलेले यशपाल भिंगे हे उत्तम वक्ते आहेत, त्यांचा दांडगा अभ्यास आणि उत्कृष्ट वक्तृत्व शैलीमुळे वंचित बहुजन आघाडीने त्यांना 2019 सालातल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. यावेळी एमआयएम आणि वंचित आघाडी हे दोन्ही पक्ष एकत्र होते. त्यातच भिंगे यांना वैयक्तिकरित्या चाहणारा समाज नांदेड लोकसभा क्षेत्रात बऱ्यापैकी आहे. त्याचाच परिणाम असा झाला की भिंगे यांना लोकसभेला दीड लाखाहून अधिकची मते मिळाली होती. या निवडणुकीत झालेल्या पराभवाला काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी वंचित आघाडीला जवाबदार धरले होते.
येत्या रविवारी BRSचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची नांदेडच्या लोहा इथे सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे, नागनाथ घिसेवाड, जाकेर चाऊस यांच्यासह काहींचा प्रवेश होणार आहे. बीआरएस पक्षाला मराठवाड्यात जम बसवायचा असून त्यासाठी ते अनेक नेत्यांशी संपर्कात आहेत. इतकंच नाही तर अनुभवी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्याशी बीआरएसचे नेते प्रदीर्घपणें चर्चा करत आहेत. राजकीय वातावरण समजून घेतायत. मात्र एकाहून एक कसलेले नेते आणि पक्ष महाराष्ट्रात असताना बीआरएसला इथे कितपत जम बसवता येईल,हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.