सिंधुदुर्ग : राणे विरुद्ध भास्कर जाधव वाद अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आणखी तीव्र झाला आहे. कारण भास्कर जाधव यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदींची नक्कल केल्यावरून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्याचे पडसाद उमटत आहेत. हा वाद अजूनही थांबला नाही, आमदार नितेश राणे यांनी केलेल्या विधानावरून भास्कर जाधव यांनी टीका केल्यानंतर आता नारायण राणे यांनीही भास्कर जाधवांवर खरपूस टीका केली आहे. राणेंनी भास्कर जाधव यांना थेट नाच्याची उपमा दिली आहे.
नक्कलीला नक्कलीतून उत्तर दिले जाईल
भास्कर जाधवांच्या नक्कलीला नक्कलीतून उत्तर दिले जाईल, असे नारायण राणे म्हणाले आहेत. कोकणात काही भागात नाचे आहेत, ते होळीच्या दिवशी पैसे दिले की नाचतात, त्यातला तो प्रकार त्या दिवशी विधानसभेत झाला असे म्हणत, राणे यांनी भास्कर जाधवांचा समाचार घेतला आहे. त्यामुळी आधी भास्कर जाधव यांनी केलेली नक्कल, नंतर नितेश राणे यांनी दिलेल्या म्याऊ म्याऊच्या घोषणा आणि आता नाच्याची उपमा यावरून राजकीय आखाड्यात जोरदार खडाखडी सुरू झाली आहे.
राणेंनी जरा चांगली नक्कल करावी
राणेंनी जरा चांगली नक्कल करावी म्हणत, भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांच्यावर पलटवार केला आहे. तुम्ही संसदेत दिलेले उत्तर संपूर्ण देशाने पाहिले आहे, आता नाच्याचे काम तर चांगले करा आणि नाव कमवा अशी टीका भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवर केली आहे. तसेच भास्कर जाधव यांनी विरोधकांना धर्मही समाजवून सांगितला आहे. भारतीय जनता पार्टीचे लोक इतरांना सौजन्याने वागण्याचे सल्ले देतात, मात्र त्यांच्या पार्टीचे लोक तालिका अध्यक्षांवर काहीही बोलतात, तेव्हा कुठे गेला होता तुमचा राधासुता धर्म? असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. तसेच नारायण राणे हे नितेश राणे चुकीचे वागत असतानाही मुलाच्या पाठिशी उभे राहत पाठराखण करत आहेत, असेही ते म्हणाले.