केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभानिवडणूक लढवत आहेत. काल त्यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत आपला उमेवादीर अर्ज दाखल केला आहे. आधी सपत्नीक देवाचं दर्शन घेतल्यानंतर राणे यांनी मीडियाशी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला अन् नंतर उमेदवारी अर्ज दाखल केला. नारायण राणे यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्यात राणेंकडे 137 कोटींची मालमत्ता असल्याचं आढळून आलं आहे. राणे हे राज्यसभेसाठी सहा वर्षापूर्वी उमेदवारी दाखल करणाऱ्या सात उमेदवारांपैकी सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नारायण राणे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. नारायण राणे यांची एकूण मालमत्ता 137 कोटी असल्याचं प्रतिज्ञापत्रातून आढळून आलं आहे. यात त्यांची वैयक्तिक मालमत्ता 35 कोटी दाखवण्यात आली आहे. राणे यांच्या पत्नी निलम राणे यांच्याकडे 75 कोटींची संपत्ती आहे. राणे कुटुंबीयांवर 28 कोटीहून अधिक कर्ज असल्याचंही त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झालं आहे.
राणे यांच्याकडे 1 कोटी 76 लाख 96 हजार 536 रुपयांचे 2552.25 ग्रॅम सोने आहे. त्यांच्याकडे 78 लाख 85 हजार 371 रुपये किंमतीचे हिरे आहेत. त्यांच्या पत्नी नीलम राणे यांच्याकडेही 1 कोटी 31 लाख 37 हजार 867 रुपयांचे 1819.90 ग्रॅमचे सोने आहे. नीलम राणे यांच्याकडे 15 लाख 38 हजार 572 रुपयांचे हिरे आणि 9 लाख 31 हजार 200 रुपयांची चांदी आहे. राणे कुटुंबाकडे एकूण 9 कोटी 31 लाख 66 हजार 631 रुपयांचा ऐवज असल्याचं आढळून आलं आहे.
शपथपत्रानुसार राणे यांच्याकडे कोकणाबरोबरच मुंबई आणि पुण्यातही मालमत्ता आहेत. राणे यांच्या वेंगुर्ला, पनवेल, कुडाळ आणि कणकवलीच्या जानवलीत जमिनी आहेत. कणकवलीत त्यांचा बंगला आहे. नीलम राणे यांच्याकडे जानवली, मालवण आणि पनवेलमध्ये गाळे आहेत. पुण्ता ऑफिस आणि मुंबईत राणे कुटुंबाचा फ्लॅट आहे. राणे यांच्या संपत्ती गेल्या सहा वर्षात 49 कोटीने वाढ झाली आहे.
उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याकडे 6 कोटी 46 लाखांची संपत्ती असल्याचं आढळून आलं आहे. विनायक राऊत यांच्याकडे 4 कोटी 25 लाखांची स्थावर मालमत्ता आहे. राऊत यांच्यावर 20 लाख 97 हजाराचे कर्ज असल्याचं प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झालं आहे.