दादर-माहीम विधानसभा मतदारसंघावरुन महायुतीत सारं काही आलबेल आहे ना? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण लोकसभा निवडणुकीवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता राज ठाकरे यांचे चिरंजीव हे स्वत: दादर-माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांना महायुतीने पाठिंबा देणं अपेक्षित होतं. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अमित ठाकरे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्याआधीच शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. सदा सरवणकर यांना मनसेकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत विनंती करण्यात आली नव्हती. पण राज ठाकरे यांनी लोकसभेला दिलेला पाठिंबा लक्षात घेता भाजप नेत्यांकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत सातत्याने विनंती करण्यात आली. पण सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.
विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणी सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांच्यासोबत भेटीची इच्छा व्यक्त केली. पण राज ठाकरे यांनी ती मागणी फेटाळली. तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर लढा नाहीतर नका लढू. आम्हाला काही देणघेणं नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी सदा सरवणकर यांच्या भेटीची मागणी फेटाळली. तर राज ठाकरेंनी आपल्या भेटीची मागणी फेटाळल्यामुळे आपण उमेदवारी अर्ज मागे घेत नसल्याचं सरणवकर यांनी जाहीर केलं. यामुळे राज ठाकरे आणि शिवसेनेत आधीच वितुष्ट आल्याचं चित्र आहे. त्यात भाजप नेते नारायण राणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर असल्याने आम्ही त्यांचंच काम करणार असल्याचं नारायण राणे म्हणाले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. लोकसभा निवडणुकीवेळी नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सिंधुदुर्गात जाहीर प्रचारसभा झाली होती. पण यावेळी विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी राज ठाकरे यांची बाजू न घेता सदा सरवणकर यांची पाठराखण करणारं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
नारायण राणे यांना आज पत्रकार परिषदेत माहीममध्ये कुणाचा प्रचार करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “आमचा उमेदवार कोण? आमचा महायुतीचा उमेदवार सदा सरवणकर आहे. त्यासाठीच आम्ही काम करणार. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सकाळी इकडे आणि संध्याकाळी तिकडे त्यातले नाहीत ना. आमचा जॉब पर्मनंट आहे”, अशी भूमिका नारायण राणे यांनी मांडली.
“त्यांनी योग्यवेळी समज देवून योग्य निर्णय घेतला, ऐवढीच आमची प्रतिक्रिया. आता आमचं काय आम्ही कोकणातले. पिठी-भात, मासे खाणारे, तिकडे कुठे मराठवाड्यात जाणार”, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली. “शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे गावोगावी जात आहेत आणि विरोधक मोठ्या प्रमाणात आमच्या पक्षात प्रवेश घेत आहेत. प्रवेशाचे कार्यक्रम सुरु आहेत. सिंधुदुर्गात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा होणार”, अशी माहिती नारायण राणे यांनी दिली.