केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खोक्याबद्दल उद्धव ठाकरेंनी बोलू नये. त्यांनी कधी खोके घेतले नाही? मी एकदा संध्याकाळी 7.30 वाजता मातोश्रीमध्ये गेलो होतो. साहेबांच्या केबिनमध्ये तीन माणसे पैसे मोजत होते. मी हे साहेबांच्या कानावर घातलं. उमेदवारी देताना त्यांच्याकडून पैसे घेत होते, असा गंभीर आरोप करतानाच दमबिम द्यायचं काम तुमचं नाही. आम्ही सोडलं आणि तुमच्याकडे आलं असं काही नाही. तुम्ही कोणाला गाडणारं? आम्ही कृती करणारी माणसे आहोत, नुसतीच बोलणारी नाही, असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
तळकोकणात काल नारायण राणे यांची मोठी सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. माझ्या एका फोनवर राज ठाकरे कोकणात आले आहेत. शब्द द्यावा, तो पूर्ण करावा त्याला म्हणतात राज ठाकरे. राज ठाकरे माणुसकी जोपासणारे नेते आहेत. मैत्रीचे पावित्र्य टिकवणारे नेते आहेत. वक्तृत्व म्हणजे राज ठाकरे. दुसरे ठाकरे (उद्धव)… नवीन शर्ट पाहिला तरी कुठून आणला असेल अस विचारतात. विकृती म्हणजे उद्धव ठाकरे आहे. हा दोन ठाकरेंमधील फरक आहे, असा हल्लाच नारायण राणे यांनी चढवला.
मोदींनी एका बाजूला मोफत धान्य दिल तर हे कोरोना काळात वॅक्सिनमध्ये कमिशन मागत होते. आपल्या राज्यात अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी गोरगरीब जनतेसाठी काय केलं? असा सवाल करतानाच कोकणात फक्त नोकरीचा प्रश्न उरलाय तो सोडवायचा आहे, असंही नारायण राणे म्हणाले.
प्रफुल्ल पटेल विमान वाहतूक मंत्री असताना एकदा माझ्याकडे गोंदियाचे काम घेऊन आले. मी म्हटलं मला सिंधुदुर्गात विमानतळ द्या, मी तुमचं काम करतो. त्यांनी उद्या सांगोत म्हणाले. त्यानंतर आम्ही कोकणात विमानतळ आणलं. आता हे क्रेडिट घेत आहेत. आम्हीच विमानतळ आणलं म्हणून सांगत आहेत. कुठून आणल रे बाबा? दुकानातून? असा सवाल करतानाच मी या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण करणार आहे. माझी क्षमता तुम्हाला माहिती आहे. 34 वर्षे तुमच्या सानिध्यात वावरताना मला तुमचं प्रेमच मिळालं आहे. बाळासाहेब यांच्यामुळे मला अनेक पदे मिळाली. आज बाळासाहेब हवे होते. जे वणवण फिरत आहेत, त्यांना असं फिरायची वेळ आली नसती, असा चिमटाही त्यांनी काढला.