सिंधुदुर्ग : जिल्हा बँकेतील विजयानंतर नारायण राणे यांनी शिवसेना आणि अजित पवारांचा तर समाचार घेतलाच मात्र आता त्यांचे टार्गेट महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आहे, असेही सांगून टाकले, येत्या विधानसभेत महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता येईल, आम्हाला भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे, लगानची टीम नकोय आम्हाला, असे सूचक विधान यावेळी नारायण राणे यांनी केले आहे. तसेच शिवसेनेवर टीका करताना राणेंनी, हे पोस्टर लावायच्याच लायकीचे आहेत, राज्याचा कारभार करण्याच्या लायकीचे नाहीत. आता एका हातात गम आणि दुसऱ्या हातात पोस्टर घेऊन लावत फिरा, असा टोला सेनेला लगावला आहे.
आमचं लक्ष्य महाराष्ट्रात सरकार
आता आमचं लक्ष्य महाराष्ट्र सरकार आहे. तिकडे आमची सत्ता नाही, यावेळी ती थोडक्यात हुकली, महाराष्ट्रात मुख्यमंत्री नाही, महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांची आणि चांगल्या सत्तेची गरज आहे, अजून अडीच वर्ष आहेत विधानसभा निवडणुकीला. तिन्ही जिल्ह्यातील विधानसभा आणि खासदार हा भाजचाच असेल, असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला आहे. ज्यांचे चेहरे पाहवत नाही अशा लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून आमचा जिल्हा ठेवणार नाही, असा टोला त्यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांना लगावला.
राणे महाराष्ट्रातील चित्र बदलणार?
कोकण आणि मुंबई महापालिका काबीज करण्याची जबाबदारी केंद्रीय नेतृत्वाने राणेंना दिली आहे. केंद्रात मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मुंबईत आल्यानंतरही राणेंनी मुंबई महापालिका यावेळी भाजपची असेल असे म्हटले होते, अलिकडेच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुका आणि आजची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक या दोन्ही वेळी भाजपचे पारडे जड दिसले आहे, त्यामुळे येत्या काळात राणे मुंबई महानगरपालिकेतील चित्र पाटलटणार का? आणि आज राणेंनी म्हटल्याप्रमाणे येत्या विधानसभेत भाजपला किती यश मिळेल? हे येणारा काळच सांगेल.