पाकिस्तानमध्ये तुम्ही आतापर्यंत केले तरी काय? दहा वर्षांत तुम्ही त्यांना धडा शिकवणार होता. परंतु पाकिस्तान व्याप्त काश्मीर आलेलेच नाही. उलट चीन भारतात घुसायला लागला आहे. त्याठिकाणी सोनम वांगचुक उपोषणास बसले आहे. त्यांच्याकडे मोदी गेले नाही, शाह गेले नाही. अरुणाचलमध्ये चीन घुसले आहे. त्या ठिकाणी आपल्या शहरांची नावे बदलली आहे. तरी ते निर्लज्जपणे म्हणतात, नाव बदलेले म्हणजे काय झाले? त्यांना कशाचे काही पडले नाही. फक्त तोडा, फोडा आणि राज्य करा, अशीच त्यांची भूमिका आहे, असा घणाघाती हल्ला उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.
शनिवारी इंडिया आघाडीची पत्रकार परिषद झाली. यावेळी राम मंदिर, पाकिस्तान, चीन यावरुन उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, पाकिस्तानचा प्रश्न मोदी सोडवू शकले नाही. परंतु देशातील पक्षांना फोडण्याचे काम करत आहे. आता या पुढे अशी परिस्थिती असणार आहे. पुढील विधानसभा निवडणुकीच्या प्रसंगी केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार असणार आहे. त्यामुळे अधिक ताकदीने आम्ही लढणार आणि जिंकणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
राम मंदिरावर काँग्रेस सरकार बुलडेझर लावतील, असे ते म्हणत असतील तर उद्या भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणणार आहे, असे म्हणावे लागणार आहे. ते उद्या संघाला नकली आरएसएस म्हणतील, अशी टीका त्यांनी केली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सुरूवातीला भारतीय जनता पक्षाची ताकद होती. त्यामुळे आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज होती. परंतु आता भाजप सक्षम झाला आहे. त्यांची ही मुलाखत वाचल्यावर भाजपपासून संघालाही धोका आहे. संघावर बंदी आणण्याची भाजपची योजना आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. संघाचे हे शंभरावे वर्ष धोक्याच ठरणार आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.