महाराष्ट्राचे दर्शन जगभरात, नरेंद्र मोदी यांनी सांगितला पोलंडमधील किस्सा

| Updated on: Aug 25, 2024 | 1:53 PM

lakhpati didi yojana: पोलंडचे लोक महाराष्ट्रातील लोकांचा मोठा सन्मान करतात. पोलंडच्या राजधानीत कोल्हापूर मेमोरियल आहे. पोलंडच्या लोकांनी हे मेमोरियल कोल्हापूरच्या लोकांची सेवा आणि सत्कारच्या भावनेला सन्मान देण्यासाठी बनवले आहे.

महाराष्ट्राचे दर्शन जगभरात, नरेंद्र मोदी यांनी सांगितला पोलंडमधील किस्सा
जळगावात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

महाराष्ट्रातील संस्कृतीचा डंका जगभरात वाजला आहे. जगभरात महाराष्ट्रीय लोकांचा चांगला सन्मान केला जात आहे. त्यासंदर्भातील उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले, मी युरोपमधून पोलंडला गेले. त्या ठिकाणी मला महाराष्ट्राचे दर्शन झाले. महाराष्ट्राची संस्कृती दिसली. पोलंडचे लोक महाराष्ट्रातील लोकांचा खूपच सन्मान करतात. पोलंडच्या राजधानीत त्यांनी कोल्हापूर मेमोरियल उभारले आहे. पोलंडच्या लोकांनी हे मेमोरियल कोल्हापूरच्या लोकांची सेवा आणि सत्कारच्या भावनेला सन्मान देण्यासाठी बनवले आहे. महाराष्ट्रातील गौरवशाली संस्कृती आणि संस्काराचे दर्शन मला सर्वत्र होते. महाराष्ट्राचे हे संस्कार भारतातच नाही तर जगात गेले आहेत.

हे दृश्य मनाला आनंद देणारे

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी जळगावात लखपती दीदी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते रविवारी झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. त्यांनी कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदी म्हणाले की, माझी नजर जिथपर्यंत जाते तेथेपर्यंत आई-बहिणींचा महासागर दिसत आहे. हे दृश्य मनाला आनंद देणारे आहे.

लाखो जण बचत गटांसोबत

लखपती दिदीचं महासंमेलन होत आहे. माझ्या सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी देशभरातून लाखो बचत गटांसाठी सहा हजार कोटींहून अधिकची रक्कम जाहीर केली आहे. लाखो बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील भगिनींना सुद्धा कोट्यवधी रुपयांची मदत मिळाली आहे. या पैशांतून लाखो बहिणींना लखपती दीदी बनवण्यात मदत मिळेल. सर्वांना माझ्या शुभेच्छा, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

मोदींनी नेपाळमधील मृतांना वाहिली श्रद्धांजली

नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा मृत्यू झाला आहे. त्या मृतांना नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, नेपाळ दुर्घटनेत आपण जळगावमधील अनेक सहकाऱ्यांना गमावले आहे. मी या लोकांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. ही दुर्घटना झाल्यावर भारत सरकारने नेपाळ सरकारशी संपर्क साधला. आपण रक्षा खडसे यांना लगेच नेपाळला पाठवलं. जे लोक राहिले नाहीत, त्यांच्या पार्थिवांना आपण वायूसेनेच्या विमानाने आणलं. जे जखमी आहेत, त्यांच्यावर चांगले उपचार सुरू आहेत.

एक कोटी दीदी लखपती झाल्या आहेत. आज 11 लाख दीदींना लखपतीचे प्रमाणपत्र मिळाले आहे. लवकरच एकूण 3 कोटी दिदी लखपती बनणार आहे.