नाशिकः राजकारण सुरूच असते. मात्र, अजूनही काही नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांसाठी जीवाचे रान करतात. हेच ध्यानात घेऊन नाशिक सिटीझन फोरमतर्फे देण्यात येणाऱ्या कार्यक्षम नगससेवक पुरस्काराने यंदा सुधाकर बडगुजर, गणेश गीते आणि सुषमा पगारे यांचा गौरव होणार आहे. या पुरस्काराने सोमवारी सातपूरच्या नाईस सभागृहात मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती नाशिक सिटीझन फोरमचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष हेमंत राठी यांनी दिली. नाशिकच्या परिपूर्ण आणि निकोप विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने नाशिक सिटीझन फोरमची स्थापना करण्यात आली आहे.
या नगरसेवकांचाही सन्मान
कोरोनाने नाशिकमध्ये अक्षरशः थैमान घातले होते. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत शहरवासीयांचे प्रचंड बेहाल झाले. या संकटकाळात काही नगरसेवकांनी उल्लेखनीय काम केले. त्यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहेत. त्यात पंचवटी विभागातील जगदीश पाटील, नाशिकरोड विभागातील जगदीश पवार, सातपूरच्या वर्षा भालेराव, सिडकोच्या छाया देवांग, नाशिक पूर्वच्या समिना मेमन आणि नाशिक पश्चिमच्या स्वाती भामरे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
अशी केली निवड
नाशिक सिटीझन फोरम 2012 पासून कार्यक्षम नगरसेवकांचा गौरव करते. यात नगरसेवकाने प्रभागात केलेले काम, महापालिकेने दिलेली माहिती, संबंधित नगरसेवकाबद्दल त्याच्या प्रभागात नागरिकांची असणारी मते यांच्या आधाराने एक अहवाल तयार केला जातो. या अहवाच्या आधारे नगरसेवकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. यंदाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला ज्येष्ठ उद्योजक आणि सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची उपस्थिती राहणार आहे. कोविड प्रतिबंधामुळे अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी हा कार्यक्रम होईल, अशी माहिती देण्यात आली.
सिटीझन ईअर
नाशिकच्या भरभराटीमध्ये अनेक सजग नागरिकांनी हात लावला. अनेकजण आजही शहरातील प्रश्नांविषयी आत्मियतेने काम करतात. त्यामुळे पुढील वर्षांपासून सजग नागरिकांचाही सन्मान करण्यात येणार आहेत. यात महिन्याला एका नागरिकाला गौरविले जाणार आहे. वर्षभरात 12 जणांचा सिटीझन ऑफ मंथ म्हणून सन्मान करण्यात येणार आहे. त्यातील एका व्यक्तीला सिटीझन ईअर पुरस्काराने गौरविले जाणार आहे, अशी माहितीही फोरमतर्फे देण्यात आली.