नाशिकः नाशिकमध्ये सध्या कोरोनाच्या 447 रुग्णांवर उपचार सुरू आहे. सर्वाधिक 250 रुग्ण नाशिक महापालिका क्षेत्रात आहेत, तर निफाडमध्ये 47 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे समोर आले आहे. ओमिक्रॉनची भीती पाहता नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्क लावणे आणि एकाच ठिकाणी जास्त गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
येथे आहेत रुग्ण
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 4 हजार 350 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 447 रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 35 ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 748 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 24, बागलाण 16, चांदवड 05, देवळा 11, दिंडोरी 15, इगतपुरी 26, कळवण 01, मालेगाव 04, नांदगाव 03, निफाड 47, पेठ 02, सिन्नर 14, सुरगाणा 08, त्र्यंबकेश्वर 01, येवला 06 अशा एकूण 183 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 250, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 07 तर जिल्ह्याबाहेरील 07 रुग्ण आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 13 हजार 545 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 02, बागलाण 04, चांदवड, देवळा 08, दिंडोरी 01, मालेगाव 01, निफाड 04 अशा एकूण 20 पॉझिटीव्ह रुग्णांचा समावेश आहे.
मास्क हेच शस्त्र
महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. या विषाणूची संसर्ग क्षमता जास्त आहे. हे ध्यानात घेता कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित अंतराचे पालन करावे. एकाच ठिकाणी गर्दी करू नये. विशेषतः प्रत्येकाने मास्क वापरावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सोबतच मास्क न घालणाऱ्यांवर पुन्हा एकदा कारवाई सुरू करण्यात आली आहे. तुम्ही कोणत्याही वाहनातून प्रवास करा. मास्क घातलेला नसेल, तर तर आता चक्क वाहनचालकाही दंड आकारण्यात येत आहे. लस नसेल, तर कुठेही प्रवेश मिळणार नाही. विनालसीकरण लोक आढळले, तर संबंधित आस्थापनांना जबाबदार धरले जाईल, या नियमांची गुरुवार 23 डिसेंबरपासून अंमलबजावणी करण्यात येत आहे.
ऑक्सिजनची चोख व्यवस्था
नाशिकमध्ये कोरोनाची दुसरी लाट भयंकर होती. ऑक्सजिनसाठी लोकांनी रस्त्यावर अक्षरशः रांगा लावल्या होत्या. याचे भयावह चित्र मीडियातून पुढे आले होते. हे पाहता आता महापालिकेने ऑक्सिजनची चोख व्यवस्था केली आहे. दररोज 4000 मेट्रीक टन ऑक्सिजन साठा उपलब्ध ठेवला जात आहे. त्यासाठी ऑक्सिजन निर्मिती करणारे 23 प्रकल्प उभारले आहेत. त्यातून 23 मेट्रीक टन ऑक्सिजनची रोज निर्मिती होणार आहे. द्रवरूप ऑक्सिजनसाठी 246 मेट्रीक टन क्षमतेच्या 19 टाक्या आहेत. 130 मेट्रीक टन साठ्याचे 7271 ऑक्सिजन सिलिंडरही तयार ठेवण्यात आले आहेत.
मांडवलीसाठी नाशिकमध्ये उद्योजकाला मागितली 2 कोटींची खंडणी; भूमाफियाची तुरुंगातून उठाठेव
भुजबळांचा धूमधडाका…पुरवणी अर्थसंकल्पात येवल्यासाठी 20 कोटी; 15 तलाठी इमारतींसाठी 4 कोटी 50 लाख मंजूर